ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज आहे. मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली ऍडलेड येथील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळून मायदेशी परतेल. त्याच्या अनुपस्थितीत भारताच्या इतर फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समाविष्ट असलेल्या, अनुभवी रोहित शर्माने आपण कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे तयार असल्याचा निर्वाळा दिला आहे.
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाहीत. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती मिळवण्यावर भर देत आहे.
संघ व्यवस्थापन सांगेल त्या क्रमांकावर खेळण्यास तयार
रोहितने एनसीएत वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले, “पहिल्या सामन्यानंतर विराट भारतात परत येईल. त्यानंतर कशा पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा याची रणनीती संघ व्यवस्थापनाने आखली असेल. सलामीवीरांची निवड देखील तेच करतील. मी ज्यावेळी ऑस्ट्रेलियाला पोहोचेल, त्यावेळी मला याची कल्पना दिली जाईल. संघ व्यवस्थापन सांगेल त्या क्रमांकावर खेळण्याची माझी तयारी आहे.”
ऑस्ट्रेलियात खेळताना येणार नाही अडचण
हूक आणि पूलचे फटके मारण्यात तरबेज असणाऱ्या रोहितला वेगवान खेळपट्ट्यांविषयी विचारले असता तो म्हणाला, “मला वाटत नाही ऑस्ट्रेलियात खेळताना जास्त अडचण येईल. कारण आता तेथील खेळपट्ट्या पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. मागील दौऱ्यात पर्थ वगळता सर्व मैदानावर खेळताना मला सहजता वाटत होती. ऑस्ट्रेलियात मला हूक आणि पूल खेळण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मी जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करेल.”
रोहितला आयपीएलमध्ये झाला होता हॅमस्ट्रिंगचा त्रास
आयपीएल २०२० वेळी मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामन्यात, रोहितला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला होता. त्यानंतर तो तीन सामन्यांना मुकला. याच दरम्यान भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली. सुरुवातीला रोहितचा समावेश एकाही संघात नव्हता. मात्र, अखेरीस रोहितला कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले. रोहितने आयपीएलच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून मुंबईला पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात, मोलाची भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
लईच भारी! महिला बीबीएलमध्ये हिलीने झळकावले शतक; पती स्टार्कने अशाप्रकारे आनंद केला साजरा
“…तर क्रिकेट बोर्डांनी खेळाडूंना आयपीएलमध्ये भाग घेण्यापासून रोखावे”, माजी दिग्गजाचे रोखठोक मत