भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहाली, पंजाब येथे खेळला जाणार आहे. आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.00 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यात अनेक जुने विक्रम मोडले जाणार आहेत, तर अनेक विक्रम रचले जाणार आहेत.
आशिया चषक 2022च्या स्पर्धेतून भारत सुपर फोरमधून बाहेर झाला. यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारताचे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघामध्ये सामना जिंंकून देणारे अनेक खेळाडू आहेत. यातील काही जणांना या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अनेक नवे विक्रम करण्याची संधी आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया हे टी20मध्ये 23 वेळा समोरा समोर आले आहेत. यातील 13 सामने भारताने तर 9 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकालच लागला नाही. तर या दोन्ही संघातील कोणते खेळाडू कोणते विक्रम मोडू शकतात ते आपण पाहुया.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा (3620) अव्वल क्रमांकावर विराजमान आहे, तर विराट कोहली (Virat Kohli) हा केवळ 36 धावांनी मागे आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितला मागे टाकण्याची संधी विराटकडे आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार
रोहित शर्मा (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार या विक्रमापासून 2 षटकार मागे आहे. या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील 172 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर रोहित 171 षटकार मारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार ओएन मॉर्गन 120 षटकार मारत तिसऱ्या स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय
भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने 21.73च्या सरासरीने 84 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन विकेट्स जरी घेतल्या तरी त्याला दोन पाकिस्तानी खेळाडूंना मागे टाकण्याची संधी आहे. सईद अजमल आणि उमर गुल यांनी प्रत्येकी 85 आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जसप्रीत बुमराह याला देखील या मालिकेत मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. त्याने 69 आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेतल्या असून त्याला 75 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेण्याची संधी आहे, त्याने जर असे केले तर तो 75 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा भुवनेश्वर आणि युझवेंद्र चहल नंतर तिसरा भारतीय गोलंदाज ठरणार आहे.
फिंचकडे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 3000 धावांचा टप्पा ओलांडण्याची संधी
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच वनडेतून निवृत्त झाला असला तरी तो संघाचा प्रमुख खेळाडू आहे. त्याने 92 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 35.24च्या सरासरीने 2855 धावा केल्या आहेत.
भारतात विराट कोहलीच्या 1500 आंतरराष्ट्रीय टी20 धावा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20मध्ये विराटचा फॉर्म जबरदस्त आहे. त्याने 19 सामन्यांमध्ये 59.83च्या सरासरीने 718 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 अर्धशतकांचा समावेशदेखील आहे, तर त्याला घरच्या मैदानावर 1500 आंतरराष्ट्रीय टी20 धावा करण्यासाठी 80 धावांची आवश्यकता आहे.