भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकांच्या जोरावर 445 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव 260 धावांवर आटोपला. तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसात वाहून गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली. त्यानंतर टीम इंडियाला फॉलोऑनची समस्या भेडसावत होती. मात्र रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि आकाश दीप यांच्यामुळे भारतीय संघ फाॅलोऑन टाळू शकला.
यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 89/7 धावांवर घोषित केला आणि भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले. भारताने 5 व्या दिवशी दुसऱ्या डावात 2.1 षटकात बिनबाद आठ धावा केल्या होत्या, जेव्हा पावसामुळे चहाचा ब्रेक लवकर घ्यावा लागला. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने पुढे खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला.
या सामन्यानंतर रविचंद्रन अश्विनने अचानक निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आर अश्विन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग-11 चा भाग नव्हता. परंतु त्याला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यानंतर तिसऱ्या सामन्याच्या प्लेइंग-11 मधून त्याला पुन्हा एकदा वगळण्यात आले. अशाप्रकारे ॲडलेड कसोटी हा अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ठरला.
अश्विनच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला. 2011 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या अश्विनने 106 कसोटी सामन्यात 537 विकेट्स घेतल्या होत्या. कुंबळेच्या पावलावर पाऊल ठेवत अश्विनने कसोटीत 500 हून अधिक बळी घेणारा अनिल कुंबळेनंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. दोन्ही गोलंदाजांच्या निवृत्तीमध्येही एक आश्चर्यकारक योगायोग पाहायला मिळाला. 2008 मध्ये अनिल कुंबळेनेही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतरच निवृत्ती जाहीर केली होती. तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर कुंबळेप्रमाणेच अश्विनचीही निवृत्ती झाली. एवढेच नाही तर अनिल कुंबळेने मिचेल जॉन्सनच्या रूपाने शेवटचा बळी घेतला आणि अश्विननेही मिशेल मार्शच्या रूपाने शेवटचा बळी घेतला.
हेही वाचा-
“मला पाकिस्तानपेक्षा श्रीमंत व्हायचं आहे”, शोएब अख्तरचं हास्यास्पद वक्तव्य
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार? दिग्गज खेळाडूचा मोठा दावा
आर अश्विनच्या निवृत्तीवर काय म्हणाला पॅट कमिन्स? कांगारु कर्णधाराचं वक्तव्य चर्चेत