भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली. टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त झालाय. सिराजला दुसऱ्या सत्रात फिल्डिंग करताना दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं.
सिराज सीमारेषेपार जाणाऱ्या चेंडूला रोखताना दुखापतग्रस्त झाला. त्यानं डाइव्ह मारून चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या प्रयत्नात तो दुखापतग्रस्त झाला. यानंतर तो खूप वेदनेत दिसला, ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. त्याच्या जागी सरफराज खान फिल्डिंगसाठी मैदानात आला आहे.
मोहम्मद सिराजनं बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानं आपल्या 7 षटकांच्या स्पेलमध्ये 1 मेडन ओव्हर टाकला आणि फक्त 19 धावा देत 1 विकेट घेतली. त्यानं बांगलादेशचा कर्णधार नजमल हुसैन शांतोला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शंतोनं 30 चेंडूत 20 धावा केल्या होत्या. तो खेळपट्टीवर सेट झाला होता. मात्र सिराजनं त्याला एका उत्कृष्ट चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद केलं. विराट कोहलीनं त्याची कॅच घेतली.
काही वेळानं जेव्हा फिरकीपटू गोलंदाजीला आले, तेव्हा सिराजला ब्रेक देण्यात आला. त्यावेळी तो सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. मात्र या दरम्यान एका चौकाराचा बचाव करताना तो दुखापतग्रस्त झाला. फिजिओ त्याच्यावर उपचार करण्यासाठी मैदानात आले, मात्र त्याला अखेर मैदान सोडावंच लागलं.
मोहम्मद सिराजची दुखापत गंभीर असल्यास ही भारतीय संघासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. कसोटी क्रिकेटमध्ये तो टीम इंडियाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. आगामी काळात भारताला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. या सामन्यांसाठी तो उपलब्ध असणं, भारतीय संघासाठी गरजेचं आहे.
हेही वाचा –
हसन महमूदची भारताविरुद्धही शानदार कामगिरी, असं करणारा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू
बाबर आझमचा इतका मोठा अपमान! पाकिस्तानी खेळाडूनं भर सामन्यात घेतली मजा
संजू सॅमसनचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, शतक झळकावून ठोकला कसोटी संघासाठी दावा