भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसानं खोळंबा घातला. यामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशनं 35 षटकांत 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. मात्र दुपारनंतर पावसाच्या आगमनामुळे संपूर्ण दिवसाचा खेळू होऊ शकला नाही. आता दुसरा दिवस देखील पावसामुळे वाहून गेला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे उद्या खेळ होतो की नाही, याकडे चाहत्याचं लक्ष असेल. सध्या मोमिनुल हक 40 आणि मुशफिकर रहीम 6 धावांवर खेळत आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं चेन्नई कसोटी सामना 280 धावांनी जिंकला होता. या सामन्यात रविचंद्रन अश्विननं अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यानं भारताच्या पहिल्या डावात शतक ठोकून संघाला अडचणीतून बाहेर काढलं. त्यानंतर गोलंदाजीत दुसऱ्या डावात 5 विकेट घेऊन भारताला विजय मिळवून दिला.
भारतासाठी दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि रिषभ पंत यांनी शानदार शतक ठोकलं होतं. दुसऱ्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन – शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद
हेही वाचा –
कानपूर कसोटी पावसानं वाहून गेल्यास WTC गुणतालिकेवर काय प्रभाव पडेल? जाणून घ्या
भारताच्या आणखी एका खेळाडूचा रस्ता अपघात, मोठ्या सामन्यातून बाहेर
सूर्याच्या नेतृत्वाखाली कोणाला मिळेल संधी? बांगलादेशविरुद्ध असा असू शकतो भारताचा टी20 संघ