भारत-बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (29 सप्टेंबर) देखील एकाही षटकाचा खेळ झाला नाही. दुसऱ्या दिवशी देखील मुसळधार पावसामुळे आऊटफील्ड ओलं होतं, त्यामुळे खेळ झाला नव्हता.
तिसऱ्या दिवसापर्यंत बांगलादेशची धावसंख्या पहिल्या डावात तीन विकेट्सवर 107 धावा आहे. सध्या मोमिनुल हक 40 आणि मुशफिकर रहीम 6 धावांवर नाबाद आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नव्हता. तर खराब प्रकाश आणि पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचाच खेळ झाला होता.
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं चेन्नईतील पहिला कसोटी सामना 280 धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात रविचंद्रन अश्विननं अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती.
दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं चांगली सुरुवात केली. परंतु आकाश दीपनं आपल्या पहिल्या षटकात झाकीर हसनला झेलबाद केलं. यशस्वी जयस्वालनं त्याचा स्लिपमध्ये झेल घेतला. त्यावेळी बांगलादेशची धावसंख्या 26 धावा होती. बांगलादेशच्या 29 धावा झाल्या असताना आकाश दीपनं दुसरा धक्का दिला. शदमान इस्लाम 24 धावा करून तंबूत परतला. उपाहारापर्यंत बांगलादेशची धावसंख्या 74/2 होती. मात्र उपाहारानंतर लगेचच कर्णधार नझमुल हुसेन शांतो (31) अश्विनच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला.
आता सामन्याचे दोन दिवस बाकी असून या दोन दिवसांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ही कसोटी ड्रॉ होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कसोटी ड्रॉ झाल्यास भारतीय संघाला त्याचं नुकसान होऊ शकतं, कारण टीम इंडियाला जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे.
हेही वाचा –
केवळ धोनीच नाही, तर या दोन दिग्गजांनाही ‘अनकॅप्ड खेळाडू’ म्हणून रिटेन करता येईल; जाणून घ्या
आयपीएल 2025 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी कधी जाहीर होणार? तारीख जाणून घ्या
पाकिस्तानची नाचक्की! सराव सामन्यात स्कॉटलँडकडून दारुण पराभव