पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहली करतोय कसुन सराव, पहा फोटो

इंदोर। टी20 मालिकेनंतर आता भारतीय संघ गुरुवारपासून(14 नोव्हेंबर) बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना इंदोरमध्ये खेळला जाणार आहे.

या सामन्यापूर्वी भारतीय संघाने कसुन सराव केला आहे. या सरावादरम्यानचे काही फोटो मंगळवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विराट इंदोरमध्ये सराव करताना दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देताना विराटने लिहिले आहे, ‘प्रशिक्षण झाले. पुन्हा भारतीय संघात येऊन छान वाटत आहे.’

भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून खेळला जाईल. तसेच या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक असेल जो दिवस- रात्र कसोटी सामना असणार आहे. भारताचा हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा सामना कोलकाता येथे खेळला जाणार आहे. 

या कसोटी मालिकेत भारताचा नियमित कर्णधार विराट पुन्हा एकदा भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विराटला विश्रांती देण्यात आली होती.

You might also like