चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा रविवारी (१४ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात १८ षटकात १ बाद ५४ धावा केल्या आहेत. भारताकडून रोहित शर्मा २५ धावांवर नाबाद आहे. तर चेतेश्वर पुजारा ७ धावांवर नाबाद आहे. तसेच भारताने पहिल्या डावात घेतलेल्या १९५ धावांच्या आघाडीमुळे दुसऱ्या दिवसाखेर भारत २४९ धावांनी पुढे आहे.
गिल १४ धावांवर बाद
या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताकडून दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीसाठी उतरले.
या दोघांनीही भारताच्या दुसऱ्या डावाची शानदार सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना दोघांनी ११ षटकांच्या आत भारताला ४० धावांचा टप्पा पार करुन दिला. मात्र, या दोघांची जोडी खेळपट्टीवर स्थिरावत असतानाच १२ व्या षटकात जॅक लीचने शुबमन गिलला पायचीत केले. त्यावर शुबमनने डीआरएस रिव्ह्यूचा वापर केला. मात्र, त्यातही तो बाद असल्याचे दिसले. शुबमनने १ षटकारासह २८ चेंडूत १४ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला.
भारताने १२ षटकात १ बाद ४६ धावा केल्या आहेत. सध्या रोहित ४२ चेंडूत २१ धावांवर आणि पुजारा २ चेंडूत ३ धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच भारत २४१ धावांनी आघाडीवर आहे.
इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर संपुष्टात
इंग्लंड संघाला पहिल्या डावात ५९.५ षटकात सर्वबाद १३४ धावा करता आल्या. त्यामुळे भारताला १९५ धावांची आघाडी मिळाली आहे. इंग्लंडकडून यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्सने सर्वाधिक नाबाद ४२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ ऑली पोपने २२ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही इंग्लंडच्या खेळाडूला २० धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि इशांत शर्माने प्रत्येकी २ विकेट्स आणि मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.
अश्विनने घेतली ५ वी विकेट
दुसऱ्या सत्राखेरपर्यंत ८ विकेट्स गमावल्यानंतर बेन फोक्सने जॅक लीचला साथीला घेतले होते. या दोघांनी मिळून इंग्लंडला फॉलोऑन मिळण्यापासून वाचवले. मात्र लीचला इशांत शर्माने ५९ व्या षटकात ५ धावांवर बाद करत इंग्लंडला ९ वा धक्का दिला. लीचचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला. त्यापुढच्याच षटकात आर अश्विनने स्टुअर्ट ब्रॉडला त्रिफळाचीत करत वैयक्तिक ५ वी विकेट घेतली आणि इंग्लंडचा डावही संपवला.
आर अश्विनने दिला इंग्लंडला ८ वा धक्का
आघाडीचे सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर बेन फोक्सने मोईन अलीसोबत मिळून डाव सावरला. पण दुसऱ्या सत्राखेर अली आणि त्यापाठोपाठ ऑली स्टोनही बाद झाला.
यष्टीरक्षक फोक्स आणि अष्टपैलू मोईन संघाची परिस्थिती लक्षात घेता सावध फलंदाजी करत मैदानावर स्थिरावले. डावातील ४७ व्या षटकापर्यंत कशाबशा त्यांनी संघाच्या १०० धावा फलकावर नोंदवल्या आहेत. पण ४९ व्या षटकात अक्षर पटेलने मोईन अलीला बाद केले. अलीने ३० चेंडूत ६ धावा केल्या. त्याच्या पुढच्याच षटकात आर अश्विनने ऑली स्टोनला बाद करत इंग्लंडला ८ वा धक्का दिला. स्टोन १ धाव करुन बाद झाला. या विकेटनंतर पंचांनी दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ थांबवला.
दुसऱ्या सत्राखेर इंग्लंडने पहिल्या डावात ४९.२ षटकात ८ बाद १०६ धावा केल्या असून अजून ते २२३ धावांनी पिछाडीवर आहेत. सध्या बेन फोक्स २३ धावांवर नाबाद खेळत आहे.
आर अश्विनच्या फिरकीत फसला बेन स्टोक्स
प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरुवात खास झाली नाही. लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडचे आघाडीचे ४ फलंदाज बाद झाले. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला आर अश्विनने बेन स्टोक्सच्या रुपात इंग्लंडला पाचवा झटका दिला.
यष्टीरक्षक ओली पोपसोबत मिळून स्टोक्स बचावात्कम खेळी करत होता. ३४ चेंडूंचा सामना करताना अवघ्या एका चौकाराच्या मदतीने त्याने १८ धावा केल्या. परंतु डावातील २३ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अश्विनच्या फिरकी चेंडूने त्याची दांडी उडवली. स्टोक्सची विकेट पडल्यानंतर इंग्लंड २४ षटकांनंतर ५ बाद ५२ धावांवर आहे. त्यांना पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अजून २७० धावांची गरज आहे.
जो रुट ठरला अक्षर पटेलची पहिली कसोटी विकेट
भारतीय गोलंदाजांनी पहिल्या ११ षटकातच २३ धावांवर इंग्लंडचे ३ फलंदाज बाद केले. त्यातही इंग्लंडचा कर्णधार जो रुट स्वस्तात पव्हेलियनला परतला.
भारताचा पदार्पणवीर अक्षर पटेलने डावातील १०.३ षटकात आर अश्विनच्या हातून रुटला झेलबाद केले. यासह रुट अक्षरचा कसोटी कारकिर्दीतील पहिला बळी ठरला. इंग्लंडच्या पहिल्या डावात रुट १२ चेंडूत अवघ्या ६ धावा करु शकला. त्याच्या रुपात भारताला तिसरी विकेट मिळाली.
Big scalp on Test debut for @akshar2026! 👍 👏#TeamIndia pick their third wicket as Joe Root departs. 👌👌 @Paytm #INDvENG
Follow the match 👉 https://t.co/Hr7Zk2kjNC pic.twitter.com/Xfsxmfa6FV
— BCCI (@BCCI) February 14, 2021
तत्पुर्वी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने डावातील तिसऱ्याच चेंडूवर रॉरी बर्न्सला शून्य धावेवर पायचित केले. त्यानंतर सलामीवीर डोमिनिक सिब्ली आर अश्विनची शिकार बनला. २५ चेंडूत १६ धावांवर विराट कोहलीच्या हाती सोपा झेल देत सिब्ली बाद झाला.
England 2⃣ down! @ashwinravi99 scalps his first wicket of the match as Dominic Sibley is caught at leg-slip by skipper @imVkohli. 👍👍 @Paytm #INDvENG #TeamIndia
Follow the match 👉 https://t.co/Hr7Zk2kjNC pic.twitter.com/W8kaAglNa4
— BCCI (@BCCI) February 14, 2021
भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर संपुष्टात
भारतीय संघाने ६ बाद ३०० या धावसंख्येपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. परंतु दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडच्या गोलंदाजांनी तळातील भारतीय फलंदाजांच्या पटापट विकेट काढल्या. त्यामुळे ९५.५ षटकात ३२९ धावांवर भारताचा पहिला डाव संपुष्टात आला.
भारताकडून या डावात रोहित शर्माने सर्वाधिक १६१ धावा केल्या. तसेच उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ६७ आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर ऑली स्टोनने ३ आणि जॅक लीचने २ विकेट्स घेतल्या.
रिषभ पंतचे अर्धशतक पूर्ण
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने पहिल्या षटकापासून फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले आहे. पहिल्या डावाखेर पंत ७७ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि ७ चौकार मारत ५८ धावांवर नाबाद राहिला. कुलदीप यादव शून्य धावेवर तर मोहम्मद सिराज ४ धावांवर बाद झाला. ओली स्टोनने या दोघांना बाद करत भारताचा पहिला डाव संपुष्टात आणला.
दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला २ धक्के
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि पदार्पणवीर अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानावर उतरले आहेत. पंत नाबाद ३३ धावा तर अक्षर नाबाद ५ धावांवर खेळत आहे. परंतु दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला एकामागे एक २ धक्के बसले आहेत. सुरुवातीला मोईन अलीने बेन फोक्सच्या हातून अक्षरला यष्टीचित केले. त्यानंतर इशांत शर्माही शून्य धावेवर झेलबाद झाला. आता पंत आणि कुलदीप यादव मैदानावर आहेत. भारतीय संघ ९० षटकांनंतर ८ बाद ३०१ धावांवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
होय पक्काच! चेन्नई कसोटीत टीम इंडियाच्या ३०० पार धावा, मग विजय मिळणं निश्चित?
पती नंबर १..! पत्नीच्या बोटांमध्ये वेदना होत असल्याने रोहितने ‘असा’ केला उपचार, पाहा तो प्रेमळ क्षण
पंत-स्टोक्समध्ये जुंपली! पहिल्या दिवसाच्या शेवटी झाली शाब्दिक बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल