भारतीय संघानं इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी घेतली असली तरी संघ शेवटच्या कसोटी सामन्यात पूर्ण ताकदीनं उतरण्याच्या तयारीत आहे. मात्र या सामन्यासाठी टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे संघाचं गोलंदाजी कॉम्बिनेशन! या सामन्यात तीन वेगवान गोलंदाजांसह जायचं की तीन फिरकीपटूंसह उतरायचं, यावर संघ व्यवस्थापन चर्चा करत आहे. पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ 3 फिरकीपटूंसह मैदानात उतरला होता. (Ind vs eng test match).
तसं पाहिलं तर, भारतातील इतर मैदानांच्या तुलनेत धरमशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. या खेळपट्टीवर वेगवान आणि उसळी घेणारे चेंडू पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत कुलदीप यादवला खेळवण्याबाबत संघ व्यवस्थापन संभ्रमात आहे. या मैदानावर तीन आठवड्यांपूर्वी दिल्ली आणि हिमाचल प्रदेश यांच्यात रणजी खेळला गेला होता. या सामन्यात चार दिवसांत तब्बल ३६ विकेट पडल्या होत्या, आणि या सर्व विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या होत्या!
ही आकडेवारी पाहता, कुलदीप यादव या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी जसप्रीत बुमराहला संधी मिळू शकते. असे झाल्यास रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे संघाचे प्रमुख फिरकीपटू असतील. बुमराहसह मोहम्मद सिराज आणि आकाश दीप हे दोन वेगवान गोलंदाज संघात असतील.
धरमशालेबाबत आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे, येथील वातावरण थंड असल्यामुळे येथे फिरकीपटूंना विशेष मदत मिळत नाही. मैदानावरील आकडेवारीही हेच सांगते. येथे 49 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये फिरकीपटूंची सरासरी 41.02 आणि वेगवान गोलंदाजांची सरासरी 27.90 आहे.
याशिवाय उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी हवामान खात्यानं ढगाळ हावामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत येथे चेंडू स्विंगही होऊ शकतो. गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु ही खेळपट्टी इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीप्रमाणे हिरवी सीमर नाही. मात्र असं असली तरी येथे वेगवान गोलंदाज आपला प्रभाव पाडू शकतात, खेळपट्टीवर कमी गवत असलं तरी आऊटफील्ड हिरवेगार आहे. रिव्हर्स स्विंग होण्यास थोडा वेळ लागू शकतो.
त्यामुळे आता उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचं गोलंदाजी कॉम्बिनेशन कसं असेल? भारत नेहमीप्रमाणे तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरेल की तीन वेगवान गोलंदाजांना संधी मिळेल? हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्यानं कदाचित ऋषभ पंतला खेळताना पाहिलं नसेल’, इंग्लिश फलंदाजाच्या कमेंटवर रोहितचं चोख प्रत्युत्तर
आयपीएलमध्ये ‘सूर्या’ तळपणार! शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सुरू केली बॅटिंग
धरमशाला कसोटीत इंद्रदेव येईल ‘साहेबां’च्या मदतीला? जाणून घ्या हवामानाचा अंदाज