हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात शुबमन गिलनं शोएब बशीरविरुद्ध चौकार मारून शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे गिलनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना हे शतक ठोकलं. यासह त्यानं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
शुबमन गिलचं हे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दुसरं आणि एकंदरीत कसोटी कारकिर्दीतील चौथं शतक आहे. शुबमनच्या नावे भारतात 3 शतकं आहेत. हे त्याचं इंग्लंडविरुद्ध दुसरं शतक होतं. याच मालिकेत त्यानं विशाखापट्टणमच्या मैदानावर इंग्रजांविरुद्ध पहिलं शतक झळकावलं होतं. शुबमनचा हा 25 वा कसोटी सामना आहे.
24 वर्षीय शुबमन गिलनं 72.99 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 137 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. तो जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा रोहित शर्मा 47 धावांवर खेळत होता. शुबमननं आपलं शतक पूर्ण केलं तेव्हा रोहितची धावसंख्या 100 होती. म्हणजेच रोहितनं आपल्या स्कोअरमध्ये 53 धावांची भर घातली तेव्हा शुबमननं 100 धावा केल्या. म्हणजेच त्यानं रोहितपेक्षा जवळपास दुप्पट वेगानं धावा केल्या.
शुबमनसह कर्णधार रोहित शर्मानंही आज कसोटीतील आपलं 12वं शतक साजरं केलं. रोहित शर्मानं शोएब बशीरविरुद्ध सिंगल घेत शतक पूर्ण केलं. भारतात त्याच्या नावावर 10 शतकं आहेत. तर हे त्याचं इंग्लंडविरुद्धचं चौथं शतक होतं. या मालिकेतील त्याचं हे दुसरं शतक आहे. त्यानं राजकोटमध्ये 131 धावांची इनिंग खेळली होती.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या 57.4 षटकात 218 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं पहिल्या डावात पाच बळी घेतले. तर शंभरावी कसोटी खेळत असलेल्या रविचंद्रन अश्विननंही चार बळी घेतले. रवींद्र जडेजाला एक बळी मिळाला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 79 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
धरमशाला कसोटीचा चार्ज कॅप्टन रोहितच्या हाती! दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ठोकलं शतक
डॉन ब्रॅडमननंतर यशस्वीचाच नंबर! क्रिकेटच्या ‘या’ खास लिस्टमध्ये मिळवलं स्थान
वडिलांनी आत्महत्या केली, आईला कॅन्सर झाला; ‘बेझबॉल’चा पोस्टर बॉय बेअरस्टोचा 100 कसोटीपर्यंतचा प्रवास