भारत आणि इंग्लंड यांच्यात जारी कसोटी मालिकेत भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल वर्चस्व गाजवतोय. यशस्वीच्या झंझावाती फलंदाजीपुढे इंग्लिश गोलंदाजांनी शरणागती पत्कारली आहे. धरमशाला कसोटीच्या पहिल्या डावातही यशस्वीनं 58 चेंडूत शानदार 57 धावा केल्या. त्याच्या फलंदाजीच्या बळावर भारतानं या सामन्यावरची आपली पकड घट्ट केली आहे.
या मालिकेपूर्वी इंग्लंड संघाचा ‘बेझबॉल’ फार चर्चेत होता. बेझबॉल म्हणजे कसोटीत पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करणे. मात्र भारतीय संघानं या मालिकेत इंग्लंडच्या ‘बेझबॉल’चा पार धुव्वा उडवला आहे. या मालिकेत खेळाचा एक नवा प्रकार उदयास आला, तो म्हणजे यशस्वी जयस्वालचा ‘जॅसबॉल’!
यशस्वी जयस्वालनं या मालिकेत आतापर्यंत 9 डावात 2 शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीनं सर्वाधिक 712 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 79.91 राहिला. तो या मालिकेत द्विशतक झळकवणारा एकमेव फलंदाज आहे. विशेष बाब म्हणजे, यशस्वीनं मालिकेत केवळ 9 डावात तब्बल 26 षटकार ठोकले. एवढे षटकार विराट कोहली, युवराज सिंह, सुनील गावसकर यांच्यासारखे दिग्गज फलंदाज त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतही मारू शकलेले नाहीत!
या मालिकेत यशस्वी जयस्वालच्या प्रभावामुळे इतर भारतीय फलंदाजांनीही आक्रमक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच धरमशाला कसोटीत भारताच्या पहिल्या डावात शुबमन गिल, यशस्वी आणि रोहित शर्मा यांनी मिळून एकूण 11 षटकार ठोकले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा शीर्ष फळीतील तिन्ही फलंदाजांनी एका डावात किमान तीन षटकार ठोकले.
एकूणच या मालिकेत भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत 72 षटकार मारले आहेत. यापैकी २६ षटकार एकट्या यशस्वीनं मारले. दुसरीकडे, इंग्लिश फलंदाजांनी केवळ 27 षटकार ठोकले, जे यशस्वीपेक्षा एकनेच जास्त आहे. अशाप्रकारे यशस्वीनं एकट्यानं संपूर्ण इंग्लिश संघावर मात केली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
ब्रेंडन मॅक्क्युलम प्रशिक्षक आणि बेन स्टोक्स कर्णधार झाल्यापासून प्रत्येक परिस्थितीत आक्रमकपणे खेळण्याच्या इंग्लंडच्या रणनीतीला ‘बेझबॉल’ म्हणतात. मात्र आता भारतानं यशस्वी जयस्वालच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर इंग्रजांच्या या रणनीतीला चोख प्रत्युत्तर दिलंय.
धरमशाला कसोटीत भारतीय संघाला पुन्हा फलंदाजीची संधी मिळाली तर यशस्वी जयस्वाल आणखी दोन मोठे विक्रम रचू शकतो. यशस्वीनं चालू कसोटी सामन्यात आणखी 41 धावा केल्या तर तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम इंग्लिश दिग्गज ग्रॅहम गूचच्या नावावर आहे, ज्यांनी 1990 च्या कसोटी मालिकेत 752 धावा केल्या होत्या.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा
1. ग्रॅहम गूच (1990) – 3 सामने, 752 धावा, 3 शतके
2. जो रूट (2021-22) – 5 सामने, 737 धावा, 4 शतके
3. यशस्वी जयस्वाल (2024) – 5* सामने, 712* धावा, 2 शतके
4. विराट कोहली (2016) – 5 सामने, 655 धावा, 2 शतके
5. मायकेल वॉन (2002) – 4 सामने, 615 धावा, 3 शतके
याशिवाय यशस्वीकडे माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांचा 53 वर्ष जुना विक्रम मोडण्याचीही संधी आहे. गावसकर भारतासाठी एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. त्यांनी 1971 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर 4 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 774 धावा ठोकल्या होत्या. यशस्वीला हा विक्रम मोडण्यासाठी आणखी 63 धावांची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट-युवराजला संपूर्ण कारकिर्दीत जितके षटकार मारता आले नाहीत, तितके यशस्वीनं केवळ 9 कसोटीत मारले!
धरमशालेच्या थंडीत सरफराजनं फोडला इंग्लिश गोलंदाजांना घाम! झळकावलं झंझावाती अर्धशतक
शुबमन गिलचं टीकाकारांना सडेतोड उत्तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ठोकलं शानदार शतक