धरमशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं इतिहास रचला.
यशस्वीनं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपलं नाव नोंदवलं आहे. 2023 साली कसोटी पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वालनं केवळ 9 कसोटी सामन्यांमध्ये 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या. या यादीत अव्वल स्थानी महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आहेत. त्यांनी अवघ्या सात सामन्यांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. डॉन ब्रॅडमननंतर यशस्वी जयस्वाल या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.
यशस्वी व्यतिरिक्त एव्हर्टन वीक्स, हर्बर्ट सटक्लिफ आणि जॉर्ज हेडली यांनी 9 कसोटीत एक हजार धावांचा आकडा गाठलाय. भारतीय फलंदाजांमध्ये हा विक्रम यापूर्वी सुनील गावस्कर आणि चेतेश्वर पुजारा यांच्या नावावर होता. या दोघांनीही 11 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी 57 धावा करून बाद झालेला यशस्वी जयस्वाल, सुनील गावसकर यांच्यानंतर एका कसोटी मालिकेत 700 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. सुनील गावस्कर यांनी हा पराक्रम दोनदा केला होता. त्यांनी 1971 आणि 1978 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत 700 हून अधिक धावा केल्या होत्या.
भारतासाठी एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा –
774 – सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज, 1971 (वेस्ट इंडिज मध्ये)
732 – सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज, १९७८/७९ (भारतामध्ये)
712 – यशस्वी जयस्वाल विरुद्ध इंग्लंड, 2024 (भारतामध्ये)
692 – विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2014/15 (ऑस्ट्रेलियामध्ये)
655 – विराट कोहली विरुद्ध इंग्लंड, 2016 (भारतामध्ये)
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेला इंग्लंडचा संघ 218 धावांवरच गारद झाला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीनं सर्वाधिक 79 धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवनं 72 धावांत 5 बळी घेतले. याशिवाय 100 वा सामना खेळत असलेल्या आर अश्विननं 51 धावांत 4 बळी घेतले. तर एक विकेट रवींद्र जडेजाच्या खात्यात आली.
प्रत्युत्तरात यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी भारताला वेगवान सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 20.4 षटकांत 104 धावांची भागीदारी झाली. जयस्वालच्या रूपानं भारताला पहिला धक्का बसला. तो 57 धावा करून बाद झाला. पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत रोहित शर्मा 83 चेंडूत 52 धावा आणि शुभमन गिल 39 चेंडूत 26 धावा करून नाबाद होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान
महिला क्रिकेटची सुपरस्टार हरमनप्रीत कौरचा आज वाढदिवस, विराट-धोनी नाही तर ‘या’ खेळाडूला मानते आदर्श