IND Vs ENG : भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. तर या 5 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या रांचीत होणार आहे. या सामन्याला 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका विजयाची संधी असणार आहे.
याबरोबरच भारतीय संघाने मालिका विजयासाठी नेट्समध्ये जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. तर 2017 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रांची स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. मात्र, पाच दिवस उलटूनही सामन्याचा निकाल लागला नाही आणि अखेर सामना बरोबरूत सुटला होता. तसेच या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 451 धावा केल्या होत्या. यानंतर टीम इंडिया बॅटिंगला आली तेव्हा चेतेश्वर पुजाराचे द्विशतक आणि रिद्धिमान साहाच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात ६०३ धावा केल्या होत्या.
यानंतर ऑस्ट्रेलियनने दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 204 धावा केल्या होत्या. परंतु हा सामना 5 दिवस चालून बरोबरीत सुटला होता. तसेच या सामन्यात रवींद्र जडेजाने पहिल्या डावात अर्धशतक आणि पाच विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात जडेजाने 4 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
दरम्यान, 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर, भारताने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येथे दुसरा कसोटी सामना खेळला होता. या कसोटीत टीम इंडियाने संस्मरणीय विजय मिळवला होता. तसेच येथे प्रथम फलंदाजी करताना भारताने रोहित शर्माचे द्विशतक आणि अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 497 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 162 आणि दुसऱ्या डावात 133 धावांत गारद झाला होता. त्यानंतर भारताने हा कसोटी सामना एक डाव आणि २०२ धावांनी जिंकून रांची कसोटीत भारताने विजयाचे खाते उघडले होते.
अशातच इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून टीम इंडियाचा उपकर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात मुकेश कुमार आणि आकाश दीप या दोघांपैकी एकाला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या –






