लीड्स येथील हेडिंग्ले स्टेडियमवर चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ ७८ धावांवरच गारद झाला. इंग्लंडच्या जेम्स अंडरसन आणि क्रेग ओव्हरटनच्या भेदक माऱ्यामुळे भारतावर ही बिकट परिस्थिती ओढावली. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाखेर (२५ ऑगस्ट) इंग्लंडचा संघ बिनबाद १२० धावांवर खेळत आहे. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि हसीब हमीदच्या अभेद्य भागिदारीच्या जोरावर इंग्लंडने ४२ धावांची आघाडी घेतली आहे.
दरम्यान भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत साजेशी खेळी करु शकला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने स्वत:बद्दल मोठा खुलासा केला आहे. फलंदाजी करतेवेळी आपल्याकडून नकळत एक चूक झाली. पण पंचांनी आपल्याला वेळीच सावध केल्याचे त्याने सांगितले आहे.
फलंदाजी करत असताना पंत स्विंग चेंडूचा सामना करण्यासाठी खेळपट्टीच्या थोडा बाहेर उभा राहिला होता. यामुळे त्याचा पाय खेळपट्टीच्या डेंजर एरियामध्ये (यष्टीच्या सरळ रेषेतील खेळपट्टीवरील भाग) होता. यामुळे गोलंदाजाचा चेंडू सरळ त्याच्या पायावर येऊन धडकत होता. पंचांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पंतला स्टान्स (फटका मरण्यासाठी विशिष्ट क्षेत्रात उभे राहाणे) बदलण्याचा इशारा केला.
या प्रसंगाबाबत बोलताना पंत म्हणाला की, “मी खेळपट्टीच्या बाहेर उभा होतो आणि माझा पुढचा पाय डेंजर एरियामध्ये येत होता. म्हणून पंचांनी मला म्हटले की, मी येथे फलंदाजीसाठी थांबू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी मला माझा स्टान्स बदलण्याचा आदेश दिला. पण मी एका क्रिकेटपटूच्या रुपात याबद्दल जास्त विचार केला नाही. कारण माझ्याऐवजी इतर कोणत्या फलंदाजाने असे केले असते, तर पंचांनी त्यालाही स्टान्स बदलण्यास सांगितला असता.”
दरम्यान संघाने ५६ धावांवर ४ विकेट्स गमावल्यानंतर पंत फलंदाजीसाठी आला होता. अशावेळी ९ चेंडू खेळत केवळ २ धावांवर तो ऑली रॉबिन्सनच्या चेंडूवर यष्टीरक्षक जोस बटलरच्या हातून झेलबाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
निंदनीय..! कोहली बाद होऊन मैदान सोडताना इंग्लंडच्या चाहत्यांनी हात दाखवत केलं ‘असं’ काही
भारत ७८ वर ऑल आऊट, चिंता नको! ही बातमी वाचून भारतीय चाहत्यांच्या जिवात जीव येईल






