भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका आतापर्यंत बरीच ऐतिहासिक राहिली. या मालिकेत अनेक जुने रेकॉर्ड उद्ध्वस्त झाले आहेत. आता या मालिकेत टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 147 वर्षांपासून कायम असलेला विक्रम मोडीत निघाला आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका ही पहिली मालिका ठरली ज्यामध्ये दोन्ही संघांनी एकूण 100 षटकार मारले! विशेष म्हणजे, हा आकडा गाठण्यात भारतीय फलंदाजांचा मोठा वाटा आहे. भारतीय फलंदाजांनी या मालिकेत अत्यंत आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्यामुळे ही मालिका कसोटी इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवल्या जाईल यात शंका नाही.
या मालिकेत पाहुणा इंग्लंडचा संघ यजमान भारताविरुद्ध सपशेल अपयशी ठरला. इंग्लंड प्रत्येक विभागात भारतापुढे फेल झालेला पाहायला मिळाला. जरी इंग्लंडनं मालिकेची सुरुवात विजयानं केली होती, मात्र त्यानंतर टीम इंडियानं असं पुनरागमन केलं की इंग्लंडला एकही संधी मिळाली नाही.
हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडनं 28 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हैदराबादनंतर, मालिकेतील दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली गेली. येथे भारतानं 106 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतानं ४३४ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रांची येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीत टीम इंडियानं 5 विकेट राखून विजय मिळवला आणि मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली. अशा प्रकारे भारतानं चौथ्या कसोटीपर्यंतच मालिका जिंकली होती. आता दोन्ही संघ मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी धरमशाला येथे आमनेसामने आहेत. धरमशाला कसोटीतही टीम इंडियाच्या विजयाची अपेक्षा आहे.
इतर बातम्या-
शेरास सव्वाशेर! इंग्लंडच्या ‘बेझबॉल’ला यशस्वीच्या ‘जॅसबॉल’ने उत्तर
विराट-युवराजला संपूर्ण कारकिर्दीत जितके षटकार मारता आले नाहीत, तितके यशस्वीनं केवळ 9 कसोटीत मारले!
धरमशालेच्या थंडीत सरफराजनं फोडला इंग्लिश गोलंदाजांना घाम! झळकावलं झंझावाती अर्धशतक