आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये सूर्यकुमार यादव पहिल्यांदा भारताचे मोठ्या स्पर्धेत नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत भारताने सलग दोन सामने जिंकत सुरूवात चांगली केली आहे. त्यातील दुसरा सामना गुरूवारी (१२ फेब्रुवारी) नामिबियाविरुद्ध खेळला गेला. यामध्ये भारताने २० षटकात २०९ धावसंख्येचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात सूर्यकुमार धावा करण्यास अपयशी ठरला. तो स्टम्प-आऊट होत विकेट गमावून बसला, मात्र त्याचे हे अशाप्रकारचे बाद होणे संघासाठी शूभ आहे, कसे ते जाणून घेऊ.
सूर्यकुमार या सामन्यात १३ चेंडूत १२ धावा करत बाद झाला. तो सामन्याच्या ११व्या षटकात मोठा शॉट खेळण्याच्या नादात पुढे आला आणि नामिबियाचा विकेटकीपर जेन ग्रीनने संधी न गमावता स्टम्प उडवले. त्याचे हे बाद होणे भारतासाठी चांगले लक्षण आहे. झाले असे की आयसीसी स्पर्धांमध्ये जेव्हा-जेव्हा भारतीय कर्णधार स्टम्प-आऊट झाले तेव्हा-तेव्हा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. असे आतापर्यंत तीन वेळा झाले आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली २०००च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केनियाविरुद्ध स्टम्प-आऊट झाला होता. त्यानंतर भारत अंतिम सामन्यात पोहोचला, तेथे न्यूझीलंडकडून पराभूत झाला. एमएस धोनीही २०११च्या आयसीसी वनडे विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध स्टम्प-आऊट झाला होता. भारताने नंतर अंतिम सामन्यात पोहचत श्रीलंकेला पराभूत केले होते. रोहित शर्माही २०२५च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध स्टम्प-आऊट झाला होता आणि त्यानंतर भारताने विजेतेपद पटकावले होते. आता सूर्यकुमारही स्टम्प-आऊट झाल्याने भारत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणार हे नक्की, असा अंदाज लावता येईल.
भारताने नामिबियाविरुद्ध टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील धावांच्या फरकाने आपला मोठा विजय मिळवला. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली होती. त्यामध्ये ईशान किशन आणि हार्दिक पांड्याने अर्धशतकी खेळी केल्या होत्या. ईशानने तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर हार्दिकने शिवम दुबेसोबत पाचव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली.
नामिबियाकडून सर्वाधिक धावा जेन फ्राइलिंकने २२ धावा आणि लॉरेन स्टीनकॅम्पने २९ धावा यांनी केल्या. बाकीचे फलंदाज २० पेक्षा अधिक धावाही करू शकले नाही. भारताने हा सामना ९३ धावांनी जिंकला.
या स्पर्धेत भारताचा पुढील सामना १५ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध आहे. नामिबिया त्याचदिवशी यूएसएविरुद्ध खेळणार आहे.






