भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिका नुकतीच पार पडली. या टी२० मालिकेत भारतीय संघाने ३-० अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. यानंतर आता उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये खेळला जाणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करेल. आता या सामन्यात सूर्यकुमार यादव देखील खेळणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत भारतीय संघासाठी ११ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे आणि यामध्ये २४४ धावा केल्या आहेत. त्याने देशासाठी तीन आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यात भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर देखील तो संघासोबत होता आणि त्यावेळी त्याला कसोटी संघात सामील केले गेले होते. मात्र, त्याला पदार्पण करता आले नव्हते. सुर्यकुमारच्या एकंदरीत प्रथमश्रेणी क्रिकेटमधील कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने ७७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि त्यात ५,३२६ धावा केल्या आहेत.
एका प्रमुख वृत्तसंस्थेने सूर्यकुमारच्या कसोटी संघातील पुनरागमनाविषयी माहिती दिली आहे. वृत्तानुसार भारतीय संघाशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले आहे की, ‘सूर्यकुमार कसोटी संघात पुनरागमन करणार आहे. तो कोलकातामधून कानपूरमध्ये भारतीय कसोटी संघात सामील होईल.”
दरम्यान, कोलकातामध्ये रविवारी (२१ नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी२० मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ७३ धावांनी विजय मिळवला. सूर्यकुमारने या सामन्यात चार चेंडू खेळले आणि एकही धाव न करता बाद झाला. असे असले तरी, त्यान पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळण्याबाबत माहिती समोर आली आहे. भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विश्रांतीवर आहे. विराट मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघासोबत सामील होईल.
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, मयंक अगरवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएल राहुल, ऋद्धिमान साहा, श्रीकर भरत, जयंत यादव, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.