---Advertisement---

द्रविड यांनी दाखवले हिमालयाएवढे दातृत्व! मैदान कर्मचाऱ्यांना केली ‘अशा’ प्रकारची मदत

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 11:10 PM
coach-dravid
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी अनिर्णित राहिली. ग्रीन पार्क स्टेडियमवर भारतीय संघ विजयाच्या समीप पोहोचला होता. मात्र, त्यांना केवळ बरोबरीतच समाधान मानावे लागले. सामन्याच्या पाच दिवसांत जबरदस्त खेळ झाला आणि पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला नाही. मात्र, भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या निराशेनंतरही असे कार्य केले, ज्याने सर्वांचीच मने जिंकली.

कानपूर कसोटीत पाच दिवस स्पर्धात्मक खेळपट्टी तयार करण्याऱ्या ग्रीन पार्क स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी, त्यांच्या वतीने प्रोत्साहनपर रक्कम सुपूर्द केली. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने सांगितले की, द्रविड यांनी मैदानावरील कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून आपल्या खिशातून ३५००० रुपये दिले.

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर ५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच कसोटी क्रिकेट खेळले गेले. शेवटची कसोटी २०१६ मध्ये झाली होती. तेव्हाही भारत-न्यूझीलंड संघ आमनेसामने होते. त्या कसोटीत भारतीय संघाला विजय मिळाला होता. मात्र, यावेळी न्यूझीलंडने भारताच्या विजयात अडथळा आणला. शेवटच्या अर्ध्या तासात भारताला विजयासाठी एका विकेटची गरज होती. मात्र, एजाज पटेल आणि रचिन रवींद्र यांनी उत्कृष्ट संयम दाखवत शेवटची विकेट वाचवून न्यूझीलंडला यजमानांविरुद्धच्या पराभवापासून वाचवले.

सामना संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात निराशा दिसून येत होती. द्रविड हे मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिल्याच कसोटीत विजयापासून वंचित राहिले. मात्र, असे असतानाही द्रविड यांनी आपले मोठे मन दाखवून दिले. सामना संपल्यानंतर ग्रीन पार्क स्टेडियमच्या प्रेस बॉक्समध्ये द्रविड यांच्या या कामाची माहिती यूपीसीएने दिली. यूपीसीएने सांगितले, “आम्हाला अधिकृत घोषणा करायची आहे. राहुल द्रविड यांनी वैयक्तिकरित्या आमच्या कामगारांना ३५,००० रुपये दिले आहेत.”

न्यूझीलंड क्रिकेट संघाने मैदानात चमकदार कामगिरी करून मन जिंकले. तर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनी आपल्या कामाने चाहत्यांची मने जिंकली. या सामन्यात विजयाची संधी गमावल्यानंतर द्रविडला मुंबईत होणाऱ्या पुढील सामन्यात विजयाची आशा असेल. उभय संघांमधील मालिकेतील शेवटचा सामना ३ डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---