भारत-न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाणेफेक देखील होऊ शकली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं याबाबत माहिती दिली. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी नाणेफेक होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना बुधवारी सकाळी 9.30 वाजता सुरू होणार होता. त्यापूर्वी सकाळी 9 वाजता नाणेफेक होणार होती. पण इथे सकाळपासूनच पाऊस सुरू झाला. त्यामुळे नाणेफेक होऊ शकली नाही. बंगळुरूमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. आता बीसीसीआयनं मॅच आणि टॉसची नवीन वेळ जाहीर केली.
या सामन्यासाठी नाणेफेक गुरुवारी सकाळी 8.45 वाजता होणार आहे. तर सामना 9.15 वाजता सुरू होईल. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्राची वेळ देखील बदललेली असेल. दिवसाचं पहिलं सत्र सकाळी 9.15 ते 11.30 दरम्यान खेळलं जाईल. तर दुसरं सत्र दुपारी 12.10 ते 02.25 पर्यंत असेल. तिसरं सत्र दुपारी 02.45 ते 04.45 पर्यंत असेल.
विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांच्यासह अनेक खेळाडूंनी सामन्याच्या पहिल्या दिवशी इनडोअर सराव केला. पावसामुळे मैदान चांगलंच ओलं झालं होतं. यामुळे खेळाडूंनी इनडोअर सराव केला. मैदानावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये कोहली आणि यशस्वी मैदानातून किट बॅग घेऊन जाताना दिसतात.
या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीचं स्थान जवळपास पक्कं आहे. यशस्वीला रोहित शर्मासोबत सलामीची संधी मिळू शकते. तर विराट कोहली त्याच्या नेहमीच्या चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल.
हेही वाचा –
आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल, संघाला मिळाला नवा बॉलिंग कोच!
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची रेकॉर्डब्रेक कामगिरी, या बाबतीत रिषभ पंतला मागे टाकलं!
“मला भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचं आहे”, आयपीएल सुपरस्टारचं मोठं व्यक्तव्य