---Advertisement---

चौथ्या टी20त पुन्हा एकदा अभिषेक-सूर्याची बॅट तळपणार! वाचा विशाखापट्टणमच्या खेळपट्टीचा रिपोर्ट

On: बुधवार, जानेवारी 28, 2026 2:42 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील चौथा टी२० सामना आज (बुधवार, २८ जानेवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ ५ सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकला असून मालिकाही जिंकली आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात विजयाचा चौकार मारण्यासाठी यजमान संघ नक्कीच आतुर असेल, मात्र या खेळपट्टीवर कोणाची जादू चालणार हे जाणून घेऊ.

सध्या भारताचा टी२० संघ चांगलाच फॉर्ममध्ये आहे. भारताला धक्का देण्यासाठी न्यूझीलंडच्या संघात बदल दिसला आहे. आतातरी न्यूझीलंडला विजयाची चव चाखता येईल की नाही की खेळपट्टी त्यांचे विजयाचे स्वप्नभंग करेल.

विशाखापट्टणमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. टी२० सामन्यासाठी सपाट खेळपट्टी असून धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे चेंडूही चांगली उसळी घेणार असल्याने गोलंदाजांसाठी जमेची बाजू आहे. या मैदानाची सीमारेषा लांब आहे. त्याचा फायदा फिरकीपटूंना होईल. येथे सर्वोच्च धावसंख्या २१५ तर कमीतकमी धावसंख्या ८२ राहिली आहे.

भारताची या मैदानावरील कामगिरी पाहता हे मैदान त्यांच्यासाठी लकीच ठरलेले आहे. येथे भारताने चार टी२० सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामन्यात विजय तर एक सामना गमावला आहे. या मैदानावर भारताने २०९ धावसंख्येचा विजयी पाठलाग केला आहे. त्यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने ४२ चेंडूत ८० धावा केल्या होत्या. हा सामना भारताने एक चेंडू आणि २ विकेट्स शिल्लक राखत जिंकला होता.

त्याचबरोबर भारताचे फलंदाज या मालिकेत चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. सलामीवीर अभिषेक शर्माने पहिल्या (३५ चेंडूत ८४ धावा) आणि तिसऱ्या (२०चेंडूत नाबाद ६८ धावा) सामन्यात तुफानी अर्धशतकी खेळी केल्या आहेत. सूर्यकुमारलाही त्याचा फलंदाजीतील फॉर्म गवसला असून त्यानेही तिसऱ्या सामन्यात नाबाद अर्धशतक केले आहे. त्याने २६ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या होत्या. तसेच दुसऱ्या सामन्यात नाबाद ८२ धावा (३७ चेंडू) केल्या होत्या.

ईशान किशननेही मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विस्फोटक खेळी केली होती. त्याने ३२ चेंडूत ७६ धावा केल्या होत्या. पहिल्या तिन्ही सामन्यात भारताची फलंदाजी निरखून आली असून त्यात हे मैदानही फलंदाजांसाठी पूरक असल्याने चौथ्या टी२०मध्येही धावांचा पाऊस पडेल तर काही चकित होणारी बाब नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---