भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहशिवाय खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. दरम्यान, मैदानावर एक विचित्र घटना घडली, ज्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी किवी फलंदाजांनी सरफराज खान त्यांना सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून फिल्ड अंपायरकडे तक्रार केली. यानंतर पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि सरफराजला कडक ताकीद दिली. यावेळी विराट कोहलीही उपस्थित होता. या प्रकरणावर पंचांनी भारतीय खेळाडूंशीही बराच वेळ चर्चा केली.
टीम इंडियाचा क्षेत्ररक्षक सरफराज खान तिसऱ्या सामन्यादरम्यान शॉर्ट लेग/सिली पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत होता. यादरम्यान तो न्यूझीलंडचे फलंदाज डॅरिल मिशेल आणि विल यंग यांच्याशी सतत बोलत असल्याचं दिसलं. यामुळे किवी फलंदाज चांगलेच चिडले आणि त्यांनी याची पंचांकडे तक्रार केली. न्यूझीलंडच्या डावाच्या 32व्या षटकात ही घटना घडली. यानंतर पंचांनी रोहित शर्मा आणि सरफराज या जवळ बोलावलं आणि त्यांच्याशी संवाद साधला.
अंपायरनं रोहित शर्मासह विराट कोहलीशीही चर्चा केली. समालोचकांनी ऑन एअर सांगितलं की, डॅरिल मिशेलनं पंचांकडे तक्रार केली होती की सरफराजच्या बोलण्यानं त्याला त्रास होता आहे. यानंतर रोहित मिशेलशीही बोलला आणि हे प्रकरण तिथेच संपलं.
वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडनं आपल्या संघात दोन बदल आहेत. फिरकीपटू मिचेल सँटनरच्या जागी इश सोधी आणि टिम साऊदीच्या जागी मॅट हेन्रीला अंतिम अकरामध्ये स्थान मिळालं आहे. भारतीय संघातही एक बदल करण्यात आला. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे.
हेही वाचा –
पाकिस्तानकडून भारताचा पराभव, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक; अवघ्या 5 षटकात ठोकल्या 121 धावा!
इंग्लंडची फजिती! नेपाळविरुद्ध अवघ्या 4 षटकांत लाजिरवाणा पराभव
भारतीय संघानं बाहेर केलेल्या गोलंदाजाचा ऑस्ट्रेलियात जलवा, कांगारुंविरुद्ध 6 विकेट घेऊन जोरदार कमबॅक!