भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 14 विकेट पडल्या. प्रथम न्यूझीलंडचा संघ 235 धावांवर ऑलआऊट झाला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलनं 82 आणि विल यंगनं 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजानं 5 आणि वॉशिंग्टन सुंदरनं 4 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियानं दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या. भारतीय कर्णधार रोहित शर्मा 18 धावा करून बाद झाला तर विराट कोहली 4 धावा करून रनआऊट झाला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलनं दोन बळी घेतले.
सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आकाशदीपनं किवी संघाला पहिला धक्का दिला. त्यानं डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केलं. कॉनवेला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर टॉम लॅथम आणि विल यंग यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी झाली. वॉशिंग्टन सुंदरनं 59 धावांवर न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. सुंदरनं लॅथमला बोल्ड केलं. तो 28 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर रचिन रवींद्रही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. रचिन पाच धावा करून बाद झाला. रचिनला सुंदरनंच बोल्ड केलं. 72 धावांवर तीन विकेट पडल्यानंतर डॅरिल मिशेल आणि विल यंग यांच्यात 87 धावांची भागीदारी झाली. विल यंग 71 धावा करून बाद झाला. त्यानंतर किवी संघानं सातत्याने विकेट गमावल्या. ग्लेन फिलिप्स 17, डॅरिल मिशेल 82, ईश सोधी 7, मॅट हेन्री 0 आणि एजाज पटेल 7 धावा करून बाद झाले. अशाप्रकारे न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 235 धावांत गडगडला. रवींद्र जडेजानं भारतासाठी 5 विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरनं 4 बळी घेतले.
यानंतर भारताचा डाव सुरू झाला. सलामीला आलेल्या रोहित शर्मानं तीन चौकार मारले, पण तो जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. रोहित 18 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. एकेकाळी भारताची धावसंख्या एका विकेटवर 78 धावा होती, पण त्यानंतर लागोपाठ तीन विकेट पडल्या.
यशस्वी जयस्वाल 30, मोहम्मद सिराज 0 आणि विराट कोहली चार धावा करून बाद झाले. कोहली धावबाद झाला. दिवसअखेर शुबमन गिल 31 आणि रिषभ पंत 1 धावा करून नाबाद राहिले. न्यूझीलंडकडून आतापर्यंत एजाज पटेलनं दोन आणि विल्यम ओरूकनं एक विकेट घेतली आहे.
हेही वाचा –
5 डावात 100 धावाही नाही! रोहित शर्माला झालंय तरी काय? आकडेवारी फारच खराब
रोहित शर्माची पोकळी हा सलामीवीर कशी भरून काढणार? ऑस्ट्रेलियात होतोय पूर्णपणे फ्लॉप!
सरफराज खानवर चिडलेल्या किवी फलंदाजांची अंपायरकडे तक्रार, रोहित-कोहलीनं सांभाळलं प्रकरण