भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवार 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याकडे पाहुण्या संघाचं लक्ष असेल.
न्यूझीलंडनं मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या पराभवासह टीम इंडियानं घरच्या मैदानावर तब्बल 12 वर्षांनी कसोटी मालिका गमावली. आता रोहित ब्रिगेडला मालिका 3-0 ने गमावणं टाळायचं आहे. या सामन्यापूर्वी या बातमीद्वारे मुंबईच्या खेळपट्टीवर एक नजर टाकूया.
वानखेडेची लाल मातीची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही अनुकूल आहे. पहिले दोन दिवस फलंदाजीसाठी अनुकूल आहेत. गेम जसाजसा पुढे जाईल, तशी खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल होऊ लागते. अशा स्थितीत दोन्ही संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करू शकतात. प्रथम फलंदाजी करताना वानखेडे स्टेडियमवरची सरासरी 339 धावा आहे.
वानखेडे स्टेडियमवरील कसोटी सामन्यांचे रेकॉर्ड
सामने – 26
प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने – 11 (42.31 टक्के)
नंतर फलंदाजी करताना जिंकलेले सामने – 8 (30.77 टक्के)
नाणेफेक जिंकल्यानंतर जिंकलेले सामने – 12 (46.15 टक्के)
नाणेफेक हरल्यानंतर जिंकलेले सामने – 7 (26.92 टक्के)
सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर – 242* (सी एच लॉयड)
सर्वोत्तम गोलंदाजी (डाव) – 10/119 एजाज पटेल
सर्वोत्तम गोलंदाजी (सामना) – 14/225 एजाज पटेल
सर्वोच्च सांघिक धावसंख्या – 631 भारत
संघाची सर्वात कमी धावसंख्या – 62 न्यूझीलंड
सरासरी धावा प्रति गडी – 29.60
प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या – 339
भारत विरुद्ध न्यूझीलंड हेड टू हेड – भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 64 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडिया 22 विजयांसह किवींच्या (15) पुढे आहे. दोन्ही संघांमध्ये 27 सामने अनिर्णित राहिले. भारतात दोन्ही संघांमध्ये 37 सामने झाले, ज्यात टीम इंडिया 17-4 च्या आघाडीसह न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर तीन सामने झाले आहेत, ज्यात टीम इंडियानं दोन सामने जिंकले तर न्यूझीलंडनं एक सामना जिंकला आहे. किवी संघानं वानखेडेवर स्टेडियमवर शेवटचा सामना 1988 मध्ये जिंकला होता.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही, टीम मॅनेजमेंटचा धक्कादायक निर्णय!
पुन्हा जिवघेणा बनला क्रिकेटचा खेळ, डोक्याला चेंडू लागून 15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
विराट कोहली मुंबईत कमबॅक करणार! वानखेडे स्टेडियमवर आहे जबरदस्त आकडेवारी