न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया आपल्याच जाळ्यात अडकली. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पुण्यात टर्निंग ट्रॅक बनवण्यात आला होता. मात्र तरीही किवी संघानं रोहित अँड कंपनीचा 113 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडसाठी या सामन्यात लेफ्ट आर्म ऑफ स्पिनर मिचेल सँटनरनं एकूण 13 विकेट घेतल्या. त्यानं पहिल्या डावात 7 भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तर दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मानं पराभवाचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “हे निराशाजनक आहे. आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. याचं श्रेय न्यूझीलंडला द्यावं लागेल. ते आमच्यापेक्षा चांगले खेळले. आम्ही काही संधींचा फायदा उठवण्यात अपयशी ठरलो. आम्ही आव्हानांना उत्तर देण्यात अयशस्वी ठरलो. आम्ही चांगली फलंदाजी केली असं आम्हाला वाटत नाही.”
रोहित पुढे म्हणाला, “तुम्हाला जिंकण्यासाठी 20 विकेट्स घ्याव्या लागतील. तसेच फलंदाजांना फलकावर धावा लावाव्या लागतील. त्यांना 250 च्या जवळ ठेवणं ही मोठी लढाई होती. परंतु आम्हाला माहित होतं की ते आव्हानात्मक असणार आहे. जेव्हा त्यांनी सुरुवात केली, तेव्हा स्कोअर 200/3 होता. आमच्यासाठी पुनरागमन करून त्यांना 259 धावांवर बाद करणं हा एक चांगला प्रयत्न होता.”
भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “ही खेळपट्टी अशी नव्हती जिथे बरंच काही घडत होतं. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. जर आम्ही पहिल्या डावात थोड्या धावा केल्या असत्या, तर परिस्थिती वेगळी असती. वानखेडेवर आम्हाला चांगली कामगिरी करायची आहे आणि ती कसोटी जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हे सामूहिक अपयश आहे. मी फलंदाज किंवा गोलंदाजांना दोष देणार नाही. आम्ही चांगल्या हेतूनं वानखेडेवर येऊ.”
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 1 नोव्हेंबरपासून तिसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळला जाणार आहे.
हेही वाचा –
टीम इंडियाची वाट बिकट! आता WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जिंकावे लागतील इतके सामने
न्यूझीलंडनं अवघ्या 3 दिवसांत जिंकला सामना! भारताच्या दारुण पराभवामागचं कारण काय? जाणून घ्या
पुणे कसोटीत रोहित ब्रिगेडचा लाजिरवाणा पराभव, टीम इंडियानं घरच्या मैदानावर इतक्या दिवसांनी गमावली मालिका