---Advertisement---

पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व, आता मदार फलंदाजांवर!

On: गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024 5:04 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळला जात आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 259 धावांवर आटोपला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं 1 गडी गमावून 16 धावा केल्या. टीम इंडिया सध्या पहिल्या डावात 243 धावांनी पिछाडीवर आहे. वॉशिंग्टन सुंदर हा पुणे कसोटीतील पहिल्या दिवसाचा हिरो ठरला. त्यानं किवी संघाच्या 7 फलंदाजांना बाद करून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॅथम पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याला अश्विननं 15 धावांवर बाद केलं. विल यंगही अवघ्या 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र त्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या 62 धावांच्या भागीदारीनं किवी संघाला मजबूत स्थितीत आणलं. कॉनवेनं 76 धावांचं योगदान दिलं तर रवींद्रनं 65 धावा केल्या.

एकेकाळी न्यूझीलंडनं 3 विकेट गमावून 197 धावा केल्या होत्या. मात्र येथून त्यांचा डाव गडगडला. पाहुण्या संघाच्या शेवटच्या सहापैकी पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. न्यूझीलंडच्या डावातील शेवटच्या 6 विकेट 62 धावांतच पडल्या. किवी फलंदाज फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरसमोर संघर्ष करताना दिसले. सुंदरनं 23.1 षटकात 59 धावा देत एकूण 7 विकेट घेतल्या. अश्विननं 24 षटकं टाकली आणि 3 बळी घेतले. यासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विननं ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनला मागे टाकलं आहे. अश्विनच्या सध्या 530 विकेट आहेत.

भारतीय डावाला सुरुवात झाली तेव्हा कर्णधार रोहित शर्मा खातंही न उघडता बाद झाला. त्याला टीम साऊदीनं क्लीन बोल्ड केलं. मात्र यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. दिवसअखेर भारतानं 1 बाद 16 धावा केल्या. सध्या यशस्वी जयस्वाल 6 आणि शुबमन गिल 10 धावा करून क्रिजवर आहेत.

हेही वाचा – 

गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक! पुणे कसोटीत वॉशिंग्टनची अति ‘सुंदर’ कामगिरी
पाकिस्तानात जन्म, स्कॉटलंडमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण; आता मोडला रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड!
टीम इंडियाला मोठा धक्का, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून कर्णधार बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---