---Advertisement---

IND vs NZ: रिषभ पंतला टीम इंडियात सामील होण्यास उशीर होणार, प्रशिक्षकांनी सांगितले त्यामागचे कारण

On: बुधवार, जानेवारी 7, 2026 8:31 PM
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी टीम इंडिया आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. संघातील जवळपास सर्वच खेळाडू विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये खेळून परतत आहेत, ज्यामुळे सर्वांना चांगला ‘गेम टाइम’ मिळाला आहे. दरम्यान, (7 जानेवारी) रोजी भारतीय संघाचे सर्व खेळाडू बडोदा येथे एकत्र येत आहेत. मात्र, या कॅम्पमध्ये स्टार यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत थोडा उशिरा सामील होणार आहे. यामागचे नेमके कारण आता खुद्द प्रशिक्षकांनीच स्पष्ट केले आहे.

रिषभ पंत बडोद्यात उशिरा पोहोचणार असून, यासाठी त्याने बीसीसीआयकडून (BCCI) विशेष परवानगी मागितली होती. बोर्डानेही या खेळाडूला उशिरा संघात सामील होण्याची परवानगी दिली आहे. वास्तविक, रिषभ पंत दिल्लीसाठी विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मधील साखळी फेरीतील सर्व सामने खेळणार आहे. दिल्लीचा संघ साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना 8 जानेवारीला खेळणार आहे. या सामन्यानंतर पंत भारतीय संघात सामील होईल. पंत सध्या दिल्ली संघाचे नेतृत्व करत असून, दिल्लीने 6 पैकी 5 सामने जिंकून बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या हंगामात पंतव्यतिरिक्त विराट कोहली देखील दिल्लीसाठी खेळला होता.

क्रिकबझच्या अहवालानुसार, दिल्ली संघाचे प्रशिक्षक सरनदीप सिंह यांनी सांगितले की, पंत 8 जानेवारीचा सामना खेळूनच टीम इंडियासोबत जोडला जाईल. पंतने आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मधील 6 सामन्यांमध्ये 42.4 च्या सरासरीने आणि 112.76 च्या स्ट्राईक रेटने 212 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. असे असले तरी, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पंतला कदाचित लगेच स्थान मिळणार नाही. केएल राहुल हा यष्टिरक्षणासाठी टीम इंडियाची पहिली पसंती बनला आहे. पंतशिवाय श्रेयस अय्यर देखील विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत असल्याने संघाशी उशिरा जोडला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---