वर्षातील (2026) पहिल्या एकदिवसीय मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अपयश आल्यानंतर आता भारतीय संघ नव्या जोमाने टी-20 मालिकेत उतरायला सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार असून, पहिला सामना 21 जानेवारी रोजी नागपूरमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एक मोठा आणि चर्चेतला निर्णय घेतला आहे.
पहिल्या टी-20 सामन्याच्या पूर्वसंध्येला (20 जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाची माहिती दिली. तिलक वर्माच्या अनुपस्थितीत संघात कोणाला संधी मिळणार, हा सर्वात मोठा प्रश्न होता. सूर्याकडून यावर स्पष्ट उत्तर देण्यात आलं आहे.
दुखापतीमुळे तिलक वर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन टी-20 सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आलं असलं, तरी पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये इशान किशनलाच संधी मिळणार असल्याचं सूर्याकुमार यादवने जाहीर केलं.
रिपोर्ट्सनुसार, ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. विशेष म्हणजे, हा क्रमांक सहसा सूर्यकुमार यादवचा असतो. मात्र कर्णधार म्हणून सूर्याकडून संघहितासाठी मोठा त्याग करण्यात आला असून, तो स्वतः चौथ्या स्थानी फलंदाजीस उतरणार आहे.
जर श्रेयस अय्यरला संधी मिळाली असती, तर सूर्य तिसऱ्याच स्थानी खेळला असता. मात्र ईशानच्या कमबॅकमुळे श्रेयसला किमान दुसऱ्या सामन्यापर्यंत प्लेइंग इलेव्हनसाठी वाट पाहावी लागणार आहे.
या सामन्यासह ईशान किशन तब्बल दोन वर्षांनंतर भारतीय टी-20 संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने अखेरचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 28 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. आता नंबर-3 वर मिळालेल्या संधीचा तो कसा फायदा घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






