भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला आजपासून (बुधवार, २१ जानेवारी)सुरूवात होत आहे. यातील पहिला सामना नागपूर येथे खेळला जाणार आहे. भारत या मालिकेत सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यासाठी भारताने सराव सुरू केला असून एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या एका शॉटमुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सुर्यकुमारच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.
हार्दिक नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर नेटमध्ये सराव करत होता. यादरम्यान त्याने ज्याप्रकारे फलंदाजी करताना चेंडूला स्टेडियममध्ये पाठवले ते पाहून गंभीर आणि सूर्यकुमारही खूष झाले आहेत.
भारतासाठी नेहमी जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या हार्दिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. त्याची तयारी पाहूनही चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
हार्दिकने फलंदाजीचा सराव करताना स्टॅंड्समध्ये उभ्या असलेल्यांना मागे हटण्यास सांगितले. त्याची ही भुमिका पाहून गंभीरही चकित झाले आणि म्हणाले, “तुझा निशाना कुठे आहे?” त्यावर हार्दिक म्हणाला, “नॉर्थ विंग” आणि लगेचच त्याने स्टेडियममध्ये लांब चेंडू मारला. त्याचा हा शॉट पाहून सूर्यकुमार अष्टपैलू शिवम दुबेला म्हणतो, “अरे दुबे याने तर सेंकड टियरमध्ये शॉट मारला.”
भारताने नुकतेच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावली. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये चांगलीच निराशा पसरली आहे. भारताची टी२० मालिकेची सुरूवात उत्तम व्हावी याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
टी२० विश्वचषकाचा विचार करता हार्दिकचा फॉर्म संघासाठी महत्वाचा असणार आहे. आराम मिळावा यासाठी निवडकर्त्यांनी त्याला आणि जसप्रीत बुमराह यांना न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून वगळले होते.
हार्दिकने भारताकडून शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने २५ चेंडूत ६३ धावा केल्या होत्या आणि एक विकेटही घेतली होती. त्याचबरोबर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भाच्या विरुद्ध १३३ धावांची मोठी खेळी केली होती. यामध्ये त्याने तब्बल ११ षटकार मारले होते.






