भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जाणार आहे. यासाठी न्यूझीलंडच्या ठरवलेल्या संघात बदल झाला आहे. त्यांनी युवा अष्टपैलू क्रिस्टियन क्लार्कला टी२० संघात निवडले आहे. तो यामधील पहिल्या तीन सामन्यांसाठी संघाचा भाग असणार आहे.
ऍडम मिल्ने आणि मायकल ब्रेसवेल दुखापतग्रस्त असल्याने न्यूझीलंडची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे वेगवान गोलंदाज क्लार्क भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत खेळताना दिसेल. या मालिकेतील पहिला सामना २१ जानेवारीला नागपूर येथे खेळला जाणार आहे.
क्लार्कने भारताविरुद्धच्या विजयी वनडे मालिकेत उत्तम कामगिरी केली होती. तीन सामन्यांच्या या मालिकेत तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर राहिला. त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या संघातील निवडबाबत न्यूूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर म्हणाले, “त्याने वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली असून त्याला संधी देणे योग्य आहे. तसेच आम्हाला संघात वेगवान गोलंदाजीचा पर्याय हवा आहे.”
“आमच्याकडे उत्तम खेळाडू असून काही दुखापतीतून सावरत आहेत. तर काही खेळाडू लीग क्रिकेटनंतर टी२० विश्वचषकाआधी संघाशी जोडले जाणार आहेत”, असेही वॉल्टर यांनी पुढे सांगितले.
मिल्नेला दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या एसए २० लीगमध्ये हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली, ब्रेसवेलही भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत दुखापतग्रस्त झाला. हे दोघेही सध्या दुखापतीतून सावरत असून हे दोघेही न्यूझीलंडच्या टी२० विश्वचषकाच्या संघाचा भाग आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टी२० सामना २१ जानेवारीला नागपूरमध्ये, दुसरा सामना २३ जानेवारीला रायपूरमध्ये, तिसरा सामना २५ जानेवारीला गुवाहाटीमध्ये, चौथा सामना २८ जानेवारीला विशाखापट्टणम येथे आणि पाचवा सामना ३१ जानेवारीला तिरुवनंतपुरम येथे खेळला जाणार आहे.
न्यूझीलंड संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, क्रिस्टियन क्लार्क (पहिले तीन सामने), डेवॉन कॉनवे, जेकब डफी, झॅक फाउल्क्स, मॅट हेन्री, काइल जेमिसन, बेव्हॉन जेकब्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, ईश सोढी.






