न्यूझीलंडला टी-२० मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ २५ नोव्हेंबरपासून कसोटी मालिका खेळणार आहे. कानपूरमध्ये दोन्ही देशांमधील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला या पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. कोहलीच्या जागी अजिंक्य रहाणेकडे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून कोहली संघात पुनरागमन करेल.
न्यूझीलंडचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज इयान स्मिथ विराट कोहलीला विश्रांती देण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयावर नाराज आहे. यासोबतच त्याने रोहित शर्माला कसोटी मालिकेतून वगळण्यावर आक्षेप घेतला आहे.
न्यूझीलंडसाठी ६३ कसोटी सामने खेळलेल्या स्मिथने ‘सन डॉट कॉम डॉट ए यू’ या वेबसाईटला सांगितले, “भारताने कोहली आणि शर्माला वगळले आहे, हे मला खरोखरच आश्चर्यचकित करते की आजकाल लोकांना कसोटी क्रिकेटमध्ये विश्रांती दिली जात आहे. हे मला खूप निराश करते.”
भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांचे स्वरूप पाहता न्यूझीलंडने कानपूर कसोटीत ३ फिरकीपटू खेळवले पाहिजेत, असे इयान स्मिथने सांगितले. यासोबतच स्मिथने पहिल्या कसोटीत मैदानात पाहण्याची इच्छा असलेल्या न्यूझीलंडच्या ११ खेळाडूंची नावेही सांगितली आहेत.
स्मिथ म्हणाला, “तुमच्याकडे (नील) वॅगनर असणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तो प्रयत्न करून तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतो.” कसोटी सामन्यासाठी स्मिथच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, रचिन रवींद्र, विल्यम सोमरविले, एजाझ पटेल, काइल जेमिसन आणि नील वॅगनर यांचा समावेश आहे.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
न्यूझीलंड कसोटी संघ: केन विल्यमसन (कर्णधार), हेन्री निकोल्स, रॉस टेलर, रचिन रवींद्र, विल यंग, मिचेल सँटनर, विल्यम्स सॉमरविले, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, काइल जेमिसन, एजाज पटेल, टिम साउदी, नील वॅगनर.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! गंभीरला इसिसकडून जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांनी वाढवली सुरक्षा
भारताविरुद्धच्या वेगळ्या अन् कठीण आव्हानासाठी तयार आहे न्यूझीलंडचा ‘हा’ मातब्बर गोलंदाज
अखेर प्रतिक्षा संपली! कानपूर कसोटीत श्रेयस करणार पदार्पण; कर्णधार रहाणेने केली घोषणा