बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाला 36 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतात पहिला कसोटी विजय मिळाला आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेला असला तरी हा सामना खूपच रोमांचक झाला. मात्र, पहिल्या डावात केवळ 46 धावा करणं हे भारताच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण ठरलं. या पराभवामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतानं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये खेळल्या गेलेल्या 11 पैकी 8 सामने जिंकले होते आणि फक्त दोन गमावले होते. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला होता. भारताचे एकूण 98 गुण होते आणि गुणांची टक्केवारी 74.24 एवढी होती. मात्र बंगळुरूमधील पराभवानंतर समीकरणं झपाट्यानं बदलली आहेत. आता भारताच्या गुणांची टक्केवारी 68.06 इतकी कमी झाली आहे. या पराभवामुळे भारताचं सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणं कठीण झालं आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये 12 सामन्यांतून 8 विजय आणि एक अनिर्णितसह ऑस्ट्रेलियाचे 90 गुण आहेत. संघ 62.50 गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या पराभवाचा फायदा तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेला झालाय. श्रीलंकेनं आत्तापर्यंत खेळलेल्या नऊपैकी पाच कसोटी जिंकल्या असून चार गमावल्या आहेत. एकूण 60 गुण आणि 55.56 गुणांच्या टक्केवारीसह त्यांनी प्रथमच अंतिम फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
येत्या नोव्हेंबरच्या अखेरीस श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. श्रीलंकेनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इंग्लंड दौऱ्यातील आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास त्यांचा कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फायनलमध्ये जाण्याचा दावा आणखी मजबूत होऊ शकतो. सध्याच्या सायकलमध्ये सर्वाधिक 18 सामने खेळणारा इंग्लंडचा संघ केवळ 43.06 गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
IND VS NZ; सामना गमावताच कर्णधार रोहित शर्माच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
झिम्बाब्वेचा भीमपराक्रम! भारताचा मोठा रेकॉर्ड अगदी थोडक्यात वाचला
न्यूझीलंडसमोर भारतानं गुडघे टेकले, बंगळुरू कसोटीत रोहित ब्रिगेडचा दारुण पराभव