क्रिकेटविश्वात १९ वर्षाखालील मुलांचा वनडे विश्वचषक सुरू आहे. यामध्ये आज (रविवार, १ फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात विश्वचषकातील सुपर-६चा सामना सुरू आहे. बुलवायोमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या भारताची सुरूवात मात्र म्हणावी तशी चांगली झाली नाही. वेदांत त्रिवेदीने मात्र या संकटसमयी अर्धशतकी खेळी केली.
भारताचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि ऍरॉन जॉर्ज लवकरच विकेट गमावून बसले. त्याआधी पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी वैभवला बाद करण्याची सोपी संधी सोडली होती, मात्र त्याने त्याचा फायदा घेतला नाही. तो २२ चेंडूत ३० धावा करत बाद झाला. पाठोपाठ कर्णधार आयुष म्हात्रे शून्यावर आणि जॉर्ज १६ धावा करत बाद झाले. त्यामुळे भारताची स्थिती ८.१ षटकात ३ बाद ४७ धावा अशी झाली होती.
त्यानंतर विहान मल्होत्रा आणि वेदांत त्रिवेदी यांनी भारताचा डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. विहान २१ धावांवर बाद झाल. वेदांतने लढा सुर ठेवत अभिज्ञान कुंडूसोबत पाचव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली.
पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर वेदांत टिकून राहिला. त्याने आरएस अंबरिशसोबत सहाव्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. याबरोबरच त्याने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. तो ६८ धावा (९८ चेंडू) करत बाद झाला. तो बाद झाल्यावर भारताची स्थिती ४०.२ षटकात ६ विकेट्स गमावत १८२ धावसंख्या अशी झाली. अंबरिश २९ धावा करत विकेट गमावून बसला. तसेच नंतर आलेला कनिष्क चौहान चांगला खेळत होता मात्र त्याने ३५ धावांवर (२९ चेंडू) बाद झाला.
या सामन्यात पाकिस्तानकडून गोलंदाजीत उत्तम कामगिरी अब्दुल सुभानने केली. त्याने ९.५ षटकात ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. भारताने ४९.५ षटकात सर्व विकेट्स गमावत पाकिस्तानसमोर २५२ धावसंख्येचे लक्ष्य ठेवले आहे.
दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीच्या दृष्टीने या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. सुपर -६ची गुणतालिका पाहिली तर भारताने तीन सामने खेळले असून तिन्हीमध्ये विजय मिळवला आहे. पाकिस्ताने मात्र ३ पैकी २ सामने जिंकले आहेत.






