आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये २७वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. आज (रविवार, १५ फेब्रुवारी) कोलंबोमध्ये खेळला जाणारा हा सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याला सुरूवात संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार असून ६.३० ला नाणेफेक होईल. या सामन्यावेळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सामना रद्द होणार की पुन्हा खेळला जाणार? याबाबत आयसीसीचा काय नियम आहे, हे जाणून घेऊ.
सामन्याच्या आधी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे. त्यामुळे सामना ठरल्यावेळी सुरू झाला तेव्हाही थोडा-थोडा पाऊस सुरूच राहणार, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यांनी तर या सामन्यावेळी ८८ टक्के पाऊस पडणार अशी माहिती दिली आहे. त्यामुळे या सामन्याचे आता काय होईल, याची चर्चा सुरू झाली. हा सामना होणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे एकही षटक न खेळता रद्द झाला तर पुन्हा खेळवला जाणार नाही. या विश्वचषकात ग्रुपच्या आणि सुपर-८च्या सामन्यांसाठी आयसीसीने रिजर्व डे चा नियम ठेवलेला नाही. त्यामुळे हा सामना रद्द झाला, तर ग्रुप ए मधील या दोन्ही संघांचा हा सामना पुन्हा खेळला जाणार नाही.
या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला सलामीवीर अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानी खेळाडूंशी हॅंडशेक याच्याबाबत प्रश्न विचारले. अभिषेकबद्दल सांगताना तो म्हणाला, “पाकिस्तानला वाटते त्याने खेळावे, मग तो पाकिस्तानविरुद्ध खेळणार.”
झाले असे की पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने अभिषेक लवकर बरा व्हावा आणि त्याने आमच्याविरुद्ध खेळावे, असे विधान केले होते. समजा, आजच्या सामन्यात अभिषेक खेळला, तर संजू सॅमसनला पुन्हा एकदा बाकावर बसावे लागेल.
हॅंडशेकबद्दल सूर्यकुमार म्हणाला, “सामन्याला अजून वेळ आहे. सध्या तरी आराम करा आणि बाकीचे उद्या बघू. सामना खेळणे महत्वाचे आहे. नाणेेफेकीवेळी हॅंडशेक करायचा का नाही हे नंतर पाहू.”
या स्पर्धेचा इतिहास पाहता भारताने ८ पैकी ७ सामने जिंकले आहेत. पाकिस्तानला केवळ एक सामना जिंकता आला. तसेच दोन्ही संघांनी चालू स्पर्धेतील त्यांचे पहिले दोन सामने जिंकले आहेत. यामुळे आजचा सामना होऊ दे अशीच चाहत्यांची इच्छा आहे.






