दक्षिण आफ्रिका-भारत यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान संघाला धूळ चारली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने हा सामना गमावला असला तरी चार वर्ष जुना विक्रम मोडला आहे.
अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला आहे. यामध्ये भारताने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ५१ धावा केल्या. सलामीला आलेल्या इशान किशनने तुफान फलंदाजी केली आहे. ऋतूराज गायकवाडची विकेट पडल्यावर त्याने श्रेयस अय्यरसोबत पुढील १० षटकांमध्ये १०२ धावांची भागीदारी केली. यावेळी इशानने ४८ चेंडूत ७६ आणि अय्यरने २७ चेंडूत ३६ धावा केल्या.
भारताने २० षटके खेळताना ४ विकेट्स गमावत १४ षटकाराच्या साहाय्याने २११ धावा केल्या. याचबरोबर संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा टी२० सामन्यातील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडला. २०१८मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या सामन्यात भारताने ५ विकेट्स गमावत २०३ धावा केल्या होत्या. हा सामना भारताने २८ धावांनी जिंकला होता.
तसेच घरच्या मैदानावरही भारतीय संघाची ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. त्यांनी २०१५मध्ये धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट्स गमावत १९९ धावा केल्या होत्या. या सामन्यात रोहित शर्माने शतक केले होते. मात्र, हा सामना भारताने ७ विकेट्सने गमावला होता.
दिल्लीत झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) संघात पुनरागमन करत फलंदाजीत जोर दाखवला. त्याने २५० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत १२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार मारत नाबाद ३१ धावा केल्या.
हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ७ विकेट्स आणि ५ चेंडू शिल्लक राखत जिंकला. यावेळी डेविड मिलर (David Miller)-रस्सी वॅन डर दुसेन यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद १३१ धावा केल्या. ही भागीदारी या सामन्यातील विशेष बाब ठरली आहे.
या मालिकेत भारतीय संघ रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) दुसरा टी२० सामना बाराबाती स्टेडियम, कटक येथे १२ जूनला खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्नाटकच्या धुरंधराचा ‘पडदाफाड’ सिक्स, ‘नो लूक’ षटकाराचा Video Viral
मुरलीधरन, वॉर्नची बरोबरी करण्यापासून अँडरसन फक्त ३ विकेट्स दूर, याच मालिकेत इतिहास घडवण्याची संधी
Ranji Trophy 2022 । खुद्द क्रीडामंत्र्यानेच शतक झळकावत बंगालला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं