दिल्ली आणि कटक येथिल दोन टी२० सामने जिंकताच दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय दौऱ्याची उत्तम सुरूवात केली आहे. त्यांनी यजमान संघाला पाच सामन्यांच्या मालिकेत २-०ने मागे पाडले आहे. या मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने चाहते निराश झाले आहेत. त्यातच माजी क्रिकेटपटूंनी कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण केले आहेत.
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दुसऱ्या टी२० सामन्यात दिनेश कार्तिकला उशिरा फलंदाजीसाठी पाठवले यावरून नाराजी व्यक्त केली आहे. श्रेयस अय्यर बाद झाला असता कार्तिक ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तेव्हा ५ षटके बाकी होते.
कटकच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकल्याने भारताने प्रथम फलंदाजी केली होती. भारताने २० षटकात ६ विकेट्स गमावत १४८ धावा केल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने पॉवरप्लेमध्ये उत्तम गोलंदाजी केली होती. त्याने रीजा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस आणि रस्सी वॅन डर दुसेन यांच्या विकेट्स लवकर काढल्या. हेन्रीक क्लासेनने ८१ धावांची खेळी केल्याने हा सामना भारताने ४ विकेट्सने गमावला होता. हा भारताचा पंतच्या कर्णधारपदाखालील सलग दुसरा पराभव ठरला आहे.
गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी चर्चा करताना म्हटले, “कार्तिकला पुढे फलंदाजीसाठी पाठवायचे होते. जेणेकरून त्याने अधिक धावा जोडल्या असत्या. तो लवकर आला असता तर त्याने अधिक चेंडू खेळून नंतर मोठे शॉट्स मारले असते.”
“फिनीशरला १५व्या षटकानंतर फलंदाजीसाठी पाठवले जाते. आयपीएलमध्ये संघ शेवटचे चार-पाच षटक बाकी राहिले असता मोठे शॉट्स मारणारे फलंदाज खेळपट्टीवर पाठवतात,” असेही गावसकर पुढे म्हणाले आहेत.
अक्षर पटेल फलंदाजीला आला असता संघाचे ७ षटके बाकी होते. कार्तिकचा क्रमांक त्याच्याआधी होता. त्याने आयपीएल २०२२च्या अनेक सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना कमी चेंडूत झटपट खेळी केल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात तो लवकर फलंदाजीसाठी आला असता तर त्याने आणखी धावा जोडल्या असत्या. त्याने २१ चेंडू खेळताना २ चौकार आणि २ षकाराच्या साहाय्याने नाबाद ३१ धावा केल्या होत्या. अक्षरने १० चेंडूत ११ धावा केल्या होत्या.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी२० सामना मंगळवारी (१४ जून) विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात जिंकून भारत मालिकेत परतण्याचा प्रयत्न करणार आहे. दक्षिण आफ्रिकेची मागील दोन सामन्यातील कामगिरी पाहता भारताला या सामन्यात विजय मिळवणे अवघड वाटत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतच्या जागी ‘हा’ खेळाडू संघाचा कर्णधार असता तर भारत आज मालिकेत आघाडीवर असता…
भारतीय संघ कुठे पडतोय कमी? खेळाडूंच्या दमदार वैयक्तिक प्रदर्शनानंतरही हातून निसटतोय सामना
सीरिज पाकिस्तान- विंडीजची अन् फटका बसलाय भारताला, वनडे रँकिंगमध्ये खाल्ल्या गटांगळ्या