Rinku Singh Statement: 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला 5 विकेट्सने नमवले. असे असले, तरीही या सामन्यात सर्वाधिक धावा कुणी केल्या असतील, तर त्या भारताचा युवा फलंदाज रिंकू सिंग याने. रिंकूने आपल्या वादळी खेळीच्या जोरावर भारताला 180 धावांपर्यंतची मजल मारून दिली होती. मात्र, पावसाने व्यत्यय आणल्यामुळे यजमान संघाला 15 षटकात 152 धावांचे आव्हान मिळाले होते, जे त्यांनी 13.5 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केले. या सामन्यादरम्यान रिंकूने मीडिया बॉक्सची काचही फोडली होती. अशात पराभवानंतर केलेले रिंकू सिंगचे विधान चर्चेत आहे.
काय म्हणाला रिंकू?
रिंकू सिंग (Rinku Singh) याने म्हटले की, खेळपट्टी समजण्यासाठी त्याला वेळ लागत होता. तसेच, एकदा खेळपट्टी समजल्यानंतर त्याने मोकळेपणाने फलंदाजी केली. सामन्यानंतर बीसीसीआयने रिंकू सिंग याचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तो म्हणाला की, “खेळपट्टी थोडी कठीण होती. एकदा त्यावर सेट झाल्यानंतर मी शॉट्स मारले. सूर्यकुमार यादव मला हेच म्हणत होता की, गोंधळून जाऊ नको आणि तुझा नैसर्गिक खेळ खेळत राहा. त्याच्या शब्दांचा मला फायदा झाला.”
याव्यतिरिक्त रिंकूने सामन्यातील 19व्या षटकात एडेन मार्करम याला दोन गगनचुंबी षटकार मारले. षटकातील पाचवा आणि सहावा चेंडू रिंकूने बाऊंड्रीच्या बाहेर पाठवला. यातील एका षटकारामुळे मीडिया बॉक्सची काच तुटली. त्याविषयी बोलताना रिंकूने माफी (Rinku Singh Said Sorry) मागितली. तो म्हणाला की, “मला तर हे आता समजले आहे. त्यासाठी मी माफी मागतो.”
Maiden international FIFTY 👌
Chat with captain @surya_14kumar 💬
… and that glass-breaking SIX 😉@rinkusingh235 sums up his thoughts post the 2⃣nd #SAvIND T20I 🎥🔽 #TeamIndia pic.twitter.com/Ee8GY7eObW— BCCI (@BCCI) December 13, 2023
सलामीवीर शून्यावर तंबूत
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय (Team India) संघाचे दोन्ही सलामीवीर भोपळाही फोडू शकले नाहीत. त्यांनी शून्य धावा करत तंबूतचा रस्ता पकडला. भारताने 6 धावांवर 2 सलामीवीरांची विकेट गमावली होती. त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी धावसंख्या 55 धावांपर्यंत पोहोचवली. तिलक 29 धावा करून बाद झाला आणि भारतीय संघ दबावात आला. त्यानंतर रिंकूने कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासोबत मिळून संघाला संकटातून बाहेर काढले. रिंकूने 39 चेंडूत 68 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांचाही समावेश होता. हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय टी20 अर्धशतक ठरले. (ind vs sa 2nd t20 why did rinku singh said sorry after the match know here)
हेही वाचा-
कमबॅक असावं तर असं! 2 वर्षांनी टी20त परतताच रसेलचा राडा, ऑलराऊंड प्रदर्शनाने इंग्लंडला फोडला घाम
सिक्स असा मारा की, काच तुटली पाहिजे! रिंकू सिंगच्या षटकाराने केले मीडिया बॉक्सचे नुकसान, व्हिडिओ पाहाच