केपटाऊन कसोटीचा पहिला दिवस नाटकीय घडामोडिंनी भरलेला होता. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका संघ 55, तर भारतीय संघ 153 धावांवर सर्वबाद झाला. झटपट विकेट्स गमावल्यामुळे पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका संघाचा दुसरा डाव सुरू झाला. त्यातही पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने आपल्या तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्या. एकंदरीत पाहता केपटाऊनमधील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. एकूण 23 खेळाडूंनी पहिल्या दिवसी विकेट्स गमावल्या, तर 27 खेळाडूंनी खेळपट्टीवर हजेरी लावली.
दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण यजमान संघाचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. यासाठी सिराजने पहिल्या डावात 9 षटके गोलंदाजी करून 15 धावा खर्च केल्या. पहिल्या डावात मुकेश कुमार यानेही सर्वांना आवाक केले. मुकेशने टाकलेल्या 2.2 षटकांमध्ये एकही धाव न खर्च करता दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह यालाही दोन विकेट्स मिळाल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी काईल वेरेन याने सर्वाधिक 15, तर डेव्हिड बेडिंगहॅम याने 12 धावांची खेळी केली. संघातील इतर एकही खेळाडू पहिल्या डावात दोन आकडी धावसंख्येपर्यंत पोहोचला नाही.
प्रत्युत्तरा भारतीय संघाला पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल याच्या रुपात पहिला झटका बसला. सलामीला आलेला जयस्वाल 7 चेंडू खेळल्यानंतर एकही धाव न करता तंबूत परतला. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी अनुक्रमे 39, 36 आणि 46 धावांची खेळी केली. यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याने 34व्या षटकात वैयक्तिक 8 धावा करून विकेट गमावली. त्यानंतर भारताची फलंदाज अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळली. शेवटच्या सहा विकेट्स भारताने निर्धाव गमावल्या. म्हणजेच शेवटच्या सहा खेळाडूंपैकी एकालाही संघासाठी एक धाव देखील करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एनगिडी याने 34व्या, तर कागिसो रबाडा याने 35व्या षटकात प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेत भारताला सर्वबाद केले.
पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांची एकदा-एकदा फलंदाजी झाली होती. भारताने 98 धावांची आघाडी मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ शेवटच्या सत्रात दुसऱ्यांदा फलंदाजाला आला. सलामीला आलेला ऍडेन मार्करम दिवसाचा खेळ संपेपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिला. 36 धावांवर नाबात असलेला मार्गरम दुसऱ्या दिवशी डेव्हिड बेडिंगहॅम याच्यासोबत डावाला सुरुवात करेल. बेडिंगहॅम दिवसाखेर 7* धावांवर खेळत आहे. कर्णधाराच्या भूमिकेत खेळताना डीन एल्गर याने शेवटच्या आंतरराष्ट्रीय डावात अवघ्या 12 धावांवर विकेट गमावली. एल्गर या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. तसेच टोनी डी झोर्झी याने 1, तर स्ट्रिस्टन स्टब्स याने एका धावेवर विकेट गमावल्या. या तीन पैकी दोन विकेट्स मुकेश कुमारने, तर एक विकेट जसप्रीत बुमराहने घेतली. (IND vs SA A truly extraordinary day of Test cricket concludes in Cape Town)
केपटाऊन कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, लुंगी एलगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
महत्वाच्या बातम्या –
असं कसं झालं..! सॅल्यूट ठोकावी अशी कामगिरी केलेल्या टीम इंडियाने कसोटी इतिहासातला लाजीरवाणा विक्रमही केला नावावर
वाईट! शेवटची 14 मिनिटे आणि 12 चेंडूमध्ये टीम इंडियाच्या बत्त्या गुल, संघ ऑलआऊट