दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती महाग ठरला. त्याने चार षटकात 54 धावा दिल्या, पण त्याने दोन विकेटही घेतल्या. चक्रवर्तीने सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला यष्टिचित केले आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामची विकेट घेतली.
याआधी दुसऱ्या टी20 मध्ये चक्रवर्तीने पाच विकेट घेतल्या होत्या. चालू मालिकेतील केवळ तीन सामन्यांत त्याने 10 विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच त्याने रविचंद्रन अश्विनला मागे टाकून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चला जाणून घेऊया चक्रवर्तीने कोणता विक्रम केला आहे.
द्विपक्षीय टी20 मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा वरुण चक्रवर्ती भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम अश्विन आणि रवी बिश्नोई यांच्या नावावर संयुक्तपणे नोंदवला गेला होता. यासह, द्विपक्षीय टी20 मालिकेत 10 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
अश्विनने 2016 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या टी20 मालिकेत 3.18 च्या प्रभावी इकाॅनाॅमीसह तीन सामन्यांत नऊ विकेट घेतल्या होत्या. गेल्या वर्षी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेत, बिश्नोईने 8.20 च्या इकॉनॉमीसह पाच सामन्यात नऊ विकेट घेत अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भारतीय संघाने पुन्हा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तिसरा टी20 हा उच्च स्कोअरिंग होता आणि दोन्ही संघांनी 200 पेक्षा जास्त धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने तिलक वर्माच्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय शतकाच्या जोरावर 219/6 अशी भक्कम धावसंख्या उभारली.
धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला एक टोक धरून दीर्घ खेळी खेळता आली नाही. हेन्रिक क्लासेनने 22 चेंडूत 41 धावांची खेळी खेळली. मार्को जॅनसेनने 17 चेंडूत 54 धावा केल्या. जॅनसेनने अवघ्या 16 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. जे भारताविरुद्धच्या टी20 मधील कोणत्याही फलंदाजाचे सर्वात जलद अर्धशतक आहे.
हेही वाचा-
अक्षर पटेल बनला ‘सुपरमॅन’, हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल; पाहा VIDEO
रमणदीप सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झंझावाती पदार्पण, डेब्यूमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची प्लॅनिंग कोणाची? सामन्यानंतर मोठा खुलासा