श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याची लढत अतिशय रोमांचक ठरली. भारताच्या नवख्या शिलेदारानी शेवटपर्यंत चिवट झुंज टी२० मालिका खिशात घालण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु श्रीलंकेचा अष्टपैलू चामिका करुणारत्ने याने १९ व्या षटकात खणखणीत षटकार ठोकत सामना आपल्या बाजूने वळवला. त्याने २०० च्या स्ट्राईक रेटने धावा कुटत ४ विकेट्स राखून संघाला सामना जिंकून दिला आणि मालिकेतही १-१ ने बरोबरी साधली. करुणारत्नेने या सामन्यात ज्या बॅटने धावा केल्या, ती बॅट अजून कोणाची नव्हे तर भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या याची होती.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १३२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेने १८ व्या षटकापर्यंत ६ गडी गमावत ११३ धावा केल्या होत्या. आता त्यांना विजयासाठी फक्त १९ धावांची आवश्यकता होती. करुणारत्ने आणि धनंजय डी सिल्वा मैदानावर होते. अशात भुवनेश्वरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर एक लांबलचक षटकार मारत त्याने संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. यामुळे २० व्या षटकातील चौथ्या चेंडूतच श्रीलंका संघाने दुसरा टी२० सामना जिंकला.
या पूर्ण सामन्यादरम्यान करुणारत्नेने ६ चेंडूंमध्ये एका षटकाराच्या मदतीने १२ धावा केल्या होत्या. विशेष बाब म्हणजे, करुणारत्नेने या धावा हार्दिकच्या बॅटने केल्या होत्या. पहिल्या टी२० सामन्यापुर्वी स्वत हार्दिकने त्याची बॅट करुणारत्नेला भेट दिली होती. हार्दिक त्याचा आदर्श खेळाडू आहे. आपल्या आदर्श खेळाडूने आपल्याला भेट दिल्याने त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आनंदही व्यक्त केला होता. परंतु या बॅटनेच करुणारत्नेने भारताला पराभवाचे पाणी पाजले.
https://www.instagram.com/p/CRw1YOZBl-8/?utm_source=ig_web_button_share_sheet
करुणारत्ने बरोबर धनंजय डी सिल्वा आणि मिनोद भानुका यांनीही संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला होता. सिल्वाने शेवटपर्यंत नाबाद राहत ४० धावा केल्या होत्या. तसेच भानुकाने सलामीला फलंदाजीला येत ३६ धावा जोडल्या होत्या.
श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा आणि निर्णायक टी२० सामना गुरुवारी म्हणजे २९ जुलै रोजी होणार आहे. आर प्रेमदासा स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकत मालिकेवरही नाव कोरण्यावर उभय संघांची नजर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-