भारत आणि श्रीलंका (Ind vs SL Test Series) यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना शुक्रवारपासून (४ मार्च) मोहालीमध्ये खेळला जाणार आहे. याआधी उभय संघात टी-२० मालिका खेळली गेली, जी भारताने ३-० च्या फरकाने जिंकली. टी-२० मालिकेत श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुसल मेंडिस (Kushal Mendis) फिट नसल्यामुळे खेळला नव्हता. आता कसोटी मालिकेतूनही मेंडिसने माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Krunaeartne) मेंडिस खेळू शकणार नसल्याची माहिती दिली आहे.
दोन महिन्यांपूर्वी ज्या खेळाडूवर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बंदी घातलेली होती, त्या निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) याला मेंडिसच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. योगायोग असा आहे की, ज्या कुसल मेंडिसच्या जागी निरोशनला संधी मिळाली आहे, त्याच्यावरही श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. त्याव्यतिरिक्त दामुष्का गुणतिलकावरही बोर्डाने बंदी घातली होती.
या तिघांनी मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात बायो बबलचे उल्लंघन केले होते. याच कारणास्तव बोर्डने त्यांच्यावर एक वर्षासाठी बंदी घातलेली. परंतु ही बंदी सहा महिन्यांच्या आतमध्ये हटवली गेली. जानेवारी महिन्यात बंदी उठवल्यानंतर गुणतिलका आणि मेंडिस यांनी मैदानात पुनरागमन केले होते. पण डिकवेलाला आता पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
मोहाली कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेच्या कर्णधाराने संघाच्या प्लेइंग इलेव्हनविषयी माहिती दिली. करुणारत्ने म्हणाला की, “डिकवेला यष्टीरक्षक असेल, दुष्मंता चमिराला विश्रांती दिली जाणार आहे. तसेच तो डे-नाइट कसोटीसाठी उपलब्ध राहणार आहे, पण मेंडिस खेळू शकणार नाही. श्रीलंकन खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी खूप कष्ट घेत आहेत आणि सर्वजण चांगल्या स्थितीत आहेत. अपेक्षा आहे की, ते दोन्ही कसोटी सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसतील.” दरम्यान, भारत आणि श्रीलंकेतील दुसरा कसोटी सामना बेंगलोरमध्ये खेळला जाणार आहे, जो गुलाबी चेंडूचा आणि डे-नाइट स्वरूपात खेळला जाईल.
मेंडिसव्यतिरिक्त दुष्मंता चमिरा या वेगवान गोलंदाजाची कमी श्रीलंका संघाला भासणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना कसोटी संघातून बाहेर केले गेले आहे. या दोघांच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापन कोणत्या खेळाडूंना संधी देते?, हे पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत टायगर्स संघाला विजेतेपद
महिला विश्वचषकाचा सुरू होतोय रणसंग्राम! ‘या’ पाच भारतीय खेळाडूंवर असेल सर्वांचीच नजर
Video : ‘याला म्हणतात दर्जेदार प्रश्न’, मराठी पत्रकाराच्या प्रश्नावर कर्णधार रोहितचा ‘दिलखूश’