न्यूझीलंडच्या धरतीवर आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२२ (ICC Women’s World Cup 2022) चार मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळला जाणार आहे. भारतीय माहिला संघ ६ मार्चला विश्वचषक अभियानाची सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना कट्टर विरोधी पाकिस्तानसोबत असणार आहे. शेवटाच महिला विश्वचषक २०१७ मध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. परंतु, विजेतेपद मात्र मिळवू शकला नव्हता.
यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. संघाने विश्वचषक सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडमध्ये पाच एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाच्या प्रदर्शनावर भारतीय तसेच जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागून असेल. आपण या लेखात भारतीय महिला संघातील पाच खेळाडूंचा विचार करणार आहोत, जे संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.
१. स्म्रीती मंधाना
भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. विश्वचषक स्पर्धेत तिच्याकडून संघाला चांगली सुरुवात मिळेल अशी अपेक्षा प्रत्येक सामन्यात असेल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात तिने ६७ चेंडूत ६६ धावा केल्या होत्या. ती संघासाठी वेगात धावा करू शकतो, सोबतच खेळपट्टीवर टिकून खेळू शकते. याआधी २०१७ विश्वचषकात तिने कमाल प्रदर्शन केले होते. मागच्या विश्वचषकात खेळलेल्या ९ सामन्यांमण्यांमध्ये तिने २३२ धावा केल्या होत्या.
२. मिताली राज
भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकते. मिताली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे आणि मागच्या २३ वर्षात ती एकदिवसीय क्रिकेट खेळत आली आहे. विश्वचषक स्पर्धेत तिचा हा अनुभव संघाच्या नक्कीच कामी येईल. ती संयमी खेळी करण्यासाठी ओळखली जाते आणि मोठी भागीदारी करू शकते.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने ५९ वेळा ५० पेक्षा मोठी धावसंख्या साकारली आहे. न्यूझीलंडमध्ये तिने आतापर्यंत २३ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये साधारणतः ५० च्या सरासरीने ८४५ धावा केल्या आहेत. तसेच विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या ३१ सामन्यांमध्ये तिने ५४.२३ च्या सरासरीने ११३९ धावा केल्या आहेत.
३. झूलन गोस्वामी
भारतीय संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामीने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिने खेळलेल्या १९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये तब्बल २४५ विकेट्स नावावर केल्या आहेत. मागच्या २० वर्षांपासून ती भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि हा तिच्यासाठी शेवटचा विश्वचषक असू शकतो. तिने संपूर्ण कारकिर्दीत न्यूझीलंडमध्ये १८ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये २० विकेट्स घेतल्या आहेत. नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत तिने ५ विकेट्स घेतल्या. अशात विश्वचषकात तिच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
४. हरमनप्रीत कौर
संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखली जाते आणि वेगात धावाही करू शकते. मागच्या काही काळापासून ती फॉर्ममध्ये दिसली नसली, तरी विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत ती निर्णायक खेळी करू शकते. २०१७ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात तीने अवघ्या १११ चेंडूत १७१ धावा केल्या होत्या. हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला होता आणि तिच्या त्या खेळीची चर्चा आजूनही होत असते. मागच्या विश्वचषकाती तिने ८ सामन्यांमध्ये ६० च्या सरासरीने ३५९ धावा केल्या होत्या.
फलंदाजीसोबत ती चांगल्या प्रकारे ऑफ ब्रेक स्पिन गोलंदाजीही करू शकते. संघासाठी ही एक जमेची बाजू ठरू शकतो. विश्वचषकाच्या सराव सामन्यात तिने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध १०४ धावांची मोठी खेळी केली आहे. या खेळीनंतर तिने फॉर्ममध्ये परतल्याचे एकप्रकारे संकेतच दिले आहेत.
५. शेफाली वर्मा
भारतीय महिला संघाची युवा खेळाडू आणि खूप कमी काळात जाणकारांचे लक्ष स्वतःकडे वेधलेली शेफाली वर्माही या यादीत सहभागी आहे. शेफालीने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि दिग्गज विरेंद्र सेहवागच्या नावाने स्वतःची वेगळी ओळखही निर्माण केली. शेफाली डावाच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगात धावा करून शकते. स्म्रीती मंधानासोबत सलामी करून संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. २०२० मध्ये टी-२० विश्वचषकात शेफालीने चांगले प्रदर्शन केले होते. अशात न्यूझीलंडच्या लहान मैदानांवर पुन्हा एकदा तिची तुफान फलंदाजी पाहायला मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्मा ज्या मैदानात बनणार कसोटी कर्णधार, त्या मैदानाशी विराट कोहलीचे स्पेशल कनेक्शन