भारतीय संघाने गुरुवारी (२४ फेब्रुवारी) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ६२ धावांनी पराभवाचं पाणी पाजत सामना खिशात घातला. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २ विकेट्स गमावत निर्धारित २० षटकात १९९ धावा कुटल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. एका पाठोपाठ एक असे नियमित अंतराने विकेट्स पडले. फलंदाजीत फक्त ४ चेंडूचा सामना करणाऱ्या रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) गोलंदाजीत मात्र कमालच केली. त्याने श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश चंदीमलला बाद केले. यानंतर जडेजाने ‘पुष्पा’ सिनेमातील प्रचंड गाजलेली स्टाईल करत विकेटचे सेलिब्रेशन केले.
जडेजाने ‘मैं झुकेगा नहीं’ या डायलॉगची ऍक्शन करत आपल्या विकेटचा आनंद साजरा केला. आता या दरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CaXb3OaA5oR/?utm_source=ig_embed&ig_rid=c6c57fb1-8b48-4404-ac95-9956f6e7ef4a
हा व्हिडिओ भारतीय संघाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ११ लाख लाईक्सचा पाऊसही पडला आहे. याव्यतिरिक्त एका ट्विटर युजरनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
Ravindra Jadejahttps://t.co/kbxWlSL5hx https://t.co/A3VlCdBxqY
— Why that (@HeeZG0ne) February 24, 2022
सामन्यादरम्यान इशान किशन (Ishan Kishan) जेव्हा ८९ धावांवर बाद झाला, तेव्हा मैदानावर जडेजा आला. त्याला फक्त ४ चेंडू खेळायला मिळाले. तो नाबाद ३ धावा करत परतला होता.
यापूर्वी जडेजाने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर, २०२१ मध्ये खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धचा कानपूर कसोटी सामना खेळल्यानंतर जडेजा संघातून बाहेर आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना २०२१ सालच्या टी२० विश्वचषकादरम्यान नामीबिया संघाविरुद्ध खेळला होता. यानंतर तो न्यूझीलंड, वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० मालिका खेळू शकला नव्हता.
विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी जडेजा म्हणाला होता की, “भारतीय संघात पुनरागमन करून चांगलं वाटत आहे. टी२० आणि कसोटी मालिका खेळण्याच्या दिशेने पाहत आहे. मी खूपच उत्साहित आहे की, अडीच महिन्यांनंतर भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मी आपले रिहॅब चांगल्याप्रकारे केले आणि एनसीएमध्ये फिटनेसवरही खूप काम केले.”
जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर असलेला रवींद्र जडेजा संघात पुनरागमन करण्यासोबतच सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला होता. त्याने बनवलेले रील चाहत्यांना खूप आवडले होते. त्याने ‘पुष्पा’ सिनेमातील गाण्यांवर आणि डायलॉगवरही अनेक रील्स बनवले होते, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.
आता भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामना शनिवारी (२६ फेब्रुवारी) धरमशाला येथे होणार आहे, तर तिसरा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) धरमशाला येथे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुडा तिसऱ्यांदा भाग्यशाली; २ वेळा संधी हुकल्यानंतर, अखेर श्रीलंकेविरुद्ध केले टी२० पदार्पण