भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवारी (१२ मार्च) सुरू आहे. उभय संघातील हा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. कसोटी मालिकेतील या दुसऱ्या सामन्यापूर्वी पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि २२२ धावा शिल्लक ठेऊन मोठा विजय मिळवला होता. यामध्ये फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने मोलाचे योगदान दिले आणि दिग्गज कपिल देव यांचा सर्वाधिक कसोटी विकेट्सचा विक्रमही मोडला. आता या दुसऱ्या सामन्यात अश्विन दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज डेल स्टेनचा विक्रम मोडण्याच्या खूप जवळ आहे.
श्रीलंकेविरुद्ध मोहालीमध्ये खेळलेल्या कसोटी सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला. यामध्ये रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने ६ विकेट्स घेतल्या आणि स्वतःच्या ४३६ कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. यापूर्वी कपिल देव भारतासाठी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे दुसरे गोलंदाज होते. अश्विनने त्यांचा विक्रम मोडून या यादीत दुसरे स्थान गाठले होते. त्याव्यतिरिक्त अश्विनने या सामन्यात कसोटी विकेट्सच्या बाबतीत रंगना हेराथ आणि रचर्ड्स हेडली या दिग्गजांनाही मागे टाकले. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अश्विन दक्षिण अफ्रिकी दिग्गज डेल स्टेन (Dale Steyn) याचा विक्रम मोडीत काडू शकतो.
डेल स्टेनने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत एकूण खेळलेल्या ९३ कसोटी सामन्यांतील १७१ डावांमध्ये ४३९ विकेट्स घेतल्या आहेत, तर अश्विन त्याच्यापेक्षा फक्त चार विकेट्सने मागे आहे. अश्विनने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत खेळलेल्या ८५ कसोटी सामन्यांमधील १६० डावांमध्ये ४३६ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या शनिवारी सुरू झालेल्या सामन्यात जर अश्विनने ४ विकेट्स घेतल्या, तर तो जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा आठवा गोलंदाज बनेल, तो सध्या ९ व्या स्थानावर कायम आहे.
असे असले तरी, स्टेनला मागे टाकल्यानंतर पुढचा टप्पा अश्विनसाठी अवघड असणार आहे. कारण आठव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी अश्विनला मोठा काळा लागू शकतो. सातव्या क्रमांकावर कर्टनी वॉल्श आहेत, ज्यांनी ५१९ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. स्टेनला मागे टाकल्यानंतरही सातव्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी अश्विनला ८० विकेट्स घ्याव्या लागतील. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धचा हा दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र स्वरूपाचा असून गुलाबी चेंडूने खेळला जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
कॅलिसच्या ‘त्या’ शब्दांनी जादू केली अन् दक्षिण आफ्रिकेने ४३५ धावांचे आव्हान सहज पार केले
मोठी बातमी! आरसीबी संघ ‘या’ दिवशी करणार आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा; वाचा सविस्तर
आयएसएल: शील्ड विजेत्या जमशेदपूरला केरलाने रोखले; समदचा एकमेव गोल निर्णायक






