भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला दिमाखात सुरुवात झाली. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 जुलैपासून खेळला जात आहे. हा सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्कमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात यशस्वी जयसवाल आणि ईशान किशन या युवा खेळाडूंनी कसोटीत पदार्पण केले आहे. तसेच, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने प्लेइंग इलेव्हनमध्ये एका खेळाडूला सामील केले नाही, ज्याने 2 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
दोन वर्षांनंतर पुनरागमन, पण संघात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात एका अशा खेळाडूला संधी मिळाली आहे, जो मागील 2 वर्षांपासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. हा खेळाडू इतर कुणी नसून वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) आहे. भारतीय कसोटी संघात नवदीप सैनीला संधी मिळाली आहे. दुखापत आणि काही काळ संघातून बाहेर राहिल्याने त्याच्या कारकीर्दीला ब्रेक लागला होता, पण 2 वर्षांनंतर त्याने पुनरागमन केले. मात्र, मालिकेच्या पहिल्या सामन्यात नवदीप सैनी प्लेइंग इलेव्हन (Navdeep Saini Playing XI)मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला.
भारतीय संघासाठी खेळलेत 21 सामने
सैनीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून 2 कसोटी, 8 वनडे आणि 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 4, वनडेत 6 आणि टी20त एकूण 13 विकेट्स घेतल्या आहेत. सैनीने 2019मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला होता. डिसेंबर 2019मध्ये त्याने वनडे क्रिकेटमध्येही पदार्पण केले होते. तसेच, 2021मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला पहिल्यांदा भारताकडून कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने भारताकडून त्याचा अखेरचा सामना 2 वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.
प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या गोलंदाजांना मिळाली संधी?
डॉमिनिकाच्या विंडसर पार्क (Windsor Park) येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले आहे. तसेच, फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजा आणि आर अश्विन ही जोडगोळीही भारतीय ताफ्यात सामील आहे. विशेष म्हणजे, अश्विनने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेत विक्रमांचे मनोरेही रचले आहेत.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, ईशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकट आणि मोहम्मद सिराज. (ind vs wi 1st test this cricketer not included in team india playing 11)
महत्वाच्या बातम्या-
कधीच न थांबणारा रविचंद्रन अश्विन! वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्याच कसोटीत मिळवले खास यादीत स्थान
लायका कोवाई किंग्ज बनले टीएनपीएल 2023चे चॅम्पियन्स! कर्णधार शाहरुखचा खास सन्मान