मागील काही काळापासून भारतात क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळही लोक आवडीने पाहू लागले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अनेक पदके जिंकली. टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला या जोडीने भारताला मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळवून दिले. त्याचवेळी भारताची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू नैना जयस्वाल अडचणीत सापडली आहे.
तेलंगणाची टेबल टेनिसपटू असलेल्या नैना जयस्वालला इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवण्यात आले आहेत. तिने याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. नैनाच्या म्हणण्यानुसार, तिला इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवले जात आहेत. हा प्रकार एक-दोनदा झाला नसून, असे मेसेज पाठवून सतत त्रास दिला जात आहे. त्यानंतर आता तिने पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे.
नैनाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, काही लोक त्यांच्या मुलीला इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून त्रास देत आहेत. एका प्रमुख वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी नैनाची तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी नैनाला आश्वासन दिले आहे की, ते लवकरच आरोपीला पकडतील. यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये नैनाने फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची तक्रार दाखल केली होती.
हैदराबादच्या नैनाने भारतासाठी अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये अनेक विजेतेपदे पटकावली आहेत. नैनाने आपल्या खेळाच्या जोरावर देशातील प्रमुख महिला टेबल टेनिसपटूंमध्ये आपले नाव नोंद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतात झिम्बाब्वेचे ‘हे’ दोघे खेळाडू, एकट्याने ठोकलीत सलग २ शतके
‘भारताविरुद्ध सामना खेळताना दबाव असतो!’ पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने केले स्पष्ट