नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेला पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्याने भारताची मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी हुकली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पुढील सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.
लॉर्ड्स हे वेगवान गोलंदाजाचे नंदनवन मानले जाते. हवेत स्विंग होणारे चेंडू फलंदाजांना प्रचंड त्रास देतात. भारतीय संघ यावेळी जबरदस्त वेगवान गोलंदाजांसह इंग्लंडमध्ये पोहोचला असला तरी, लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लिश संघाविरुद्ध भारताची खराब आकडेवारी नक्कीच विचार करायला लावते.
अशी राहिली आहे एकूण कामगिरी
भारतीय संघ पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध १९३२ मध्ये लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये उतरला होता. तेव्हापासून २०१८ पर्यंत भारतीय संघ लॉर्ड्सवर केवळ २ विजय नोंदवू शकला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारताने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध एकूण १८ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने फक्त २ विजय मिळवले तर, संघाला १२ सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. सोबतच ४ सामने अनिर्णित राहिले आहेत.
सन २०१८ मध्ये जेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ लॉर्ड्सवर उतरला, तेव्हा इंग्लंडने भारताचा दारुन पराभव करत कसोटी सामना एक डाव आणि १५९ धावांनी जिंकलेला. इंग्लिश वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजी क्रम दोन्ही डावांमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारतीय संघ पहिल्या डावात १०७ व दुसऱ्या डावात १३० धावा बनवण्यात यशस्वी ठरलेला. इंग्लंडचे दोन अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी त्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांना दिवसा दाखवलेले.
धोनीच्या नेतृत्वात मिळवलेला अखेरचा विजय
भारतीय संघाने २०१४ मध्ये लॉर्ड्सवर शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. त्या विजयाची कथा भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा यांनी मिळून लिहिली होती. भुवनेश्वरने कसोटीच्या पहिल्या डावात सहा बळी घेतले, तर इशांतने दुसऱ्या डावात कहर केला. कारण त्याने एकट्याने इंग्लंड संघातील सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारताने हा कसोटी सामना ९५ धावांनी जिंकला होता. १९८६ नंतर भारताने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर विजय मिळवलेला.
जर आकडेवारीवर विश्वास ठेवायचा असेल, तर इंग्लंडच्या या ऐतिहासिक मैदानावर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला असतो. भारताला लॉर्ड्सवर तिरंगा फडकवायचा असेल, तर संघाच्या वेगवान गोलंदाजांना सर्वात्तम कामगिरी करावी लागेल. यासह, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या जोडीविरुद्ध भारतीय फलंदाज किती काळ खेळू शकतील यावरही संघाचा विजय अवलंबून असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
तीन वर्षांपूर्वी भारतासाठी जिंकला वर्ल्डकप, आता पोटापाण्यासाठी करावी लागतेय मजुरी
विराट कोहलीच्या लाडक्या लेकीचे लंडनमध्ये झाले खास स्वागत, पाहा फोटो
अतिशय लाजिरवाणे! वेदनेनं भर मैदानात विव्हळत होता फलंदाज, बघून प्रतिस्पर्धींसह हसत होते पंचही