भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचं मोठं लक्ष्य होतं, ज्याचा पाठलाग करणं जवळपास अशक्य होतं. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 238 धावांवरच आटोपला. या विजयासह भारतीय संघानं कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळला जाईल.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला. विशेष म्हणजे, पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभवाला सामोरं जावं लागलं. याआधी ऑस्ट्रेलियानं या मैदानावर चार सामने खेळले होते, ज्यात त्यांनी विजय मिळवला होता. 19 जानेवारी 2021 रोजी भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा येथे ऐतिहासिक विजय संपादन केला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियानं त्या मैदानावर तब्बल 31 वर्षांनी कसोटी सामना गमावला होता. आता भारतीय संघानं गाबा पाठोपाठ पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवरही कांगारूंच्या अभिमानाचा चक्काचूर केला आहे.
534 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. पदार्पण करणारा नॅथन मॅकस्विनी आपलं खातंही उघडू शकला नाही. तो डावाच्या पहिल्याच षटकात बुमराहचा बळी ठरला. त्यानंतर नाईटवॉचमन पॅट कमिन्सला (2) मोहम्मद सिराजनं पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तिसऱ्या दिवसाची शेवटची विकेट बुमराहनं मार्नस लाबुशेनच्या (3) रूपात घेतली.
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं 12/3 असा खेळ सुरू केला. यानंतर मोहम्मद सिराजनं दिवसाच्या दुसऱ्याच षटकात उस्मान ख्वाजा (4) याला बाद केलं. अशाप्रकारे 17 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. यानंतर स्टीव्ह स्मिथ (17) आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी धोकादायक दिसत असतानाच सिराजनं स्मिथला रिषभ पंतकडे झेलबाद केलं.
अखेर ट्रॅव्हिस हेडची (89) विकेट पडली. तो जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीत यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाती झेलबाद झाला. 161/6 च्या स्कोअरवर हेडची विकेट पडली. यानंतर काही वेळातच मिचेल मार्श (47) धावांवर बाद झाला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला. मार्श हा नितीश रेड्डीचा कसोटी क्रिकेटमधील पहिला विकेट ठरला. मिचेल स्टार्क (12) वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीत झेलबाद झाला. जो ऑस्ट्रेलियन संघाला आठवा धक्का होता.
यानंतर सुंदरनं लायनला (0) बाद करून ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिला. शेवटची विकेट ॲलेक्स कॅरीच्या (36) रूपानं पडली. त्याला हर्षित राणानं बोल्ड केलं. या डावात जसप्रीत बुमराहनं 3 आणि मोहम्मद सिराजनं 3 विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरला 2 बळी मिळाले. हर्षित राणा आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा –
“शपथ घेऊन सांगतो समोर लागला”, डीआरएस घेण्यासाठी हर्षित राणाचं मजेशीर कृत्य
IND VS AUS; ट्रॅव्हिस हेडच्या विकेटवर जसप्रीत बुमराह – विराट कोहलीचे हटके सेलिब्रेशन: पाहा VIDEO
IPL 2025 Mega auction: पहिल्या दिवसानंतर कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? किती स्लॉट बाकी? पाहा सर्वकाही