युएई येथे २३ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ आपल्या तयारीचा अखेरचा टप्पा म्हणून बुधवारी (२० ऑगस्ट) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या सराव सामन्यात मैदानात उतरला. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने संघाचे नेतृत्व केले. भारतीय फलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यात शानदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
भारतीय गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी
या सामन्यात भारतीय संघाने आपले प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली. तरीही भारतीय संघाने फिरकीने ऑस्ट्रेलिया संघावर वर्चस्व गाजवले. रविचंद्रन आश्विन याने डेव्हिड वॉर्नर याला एक तर मिचेल मार्शला पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद करत शानदार सुरुवात करून दिली. कर्णधार फिंच केवळ ८ धावांचे योगदान देऊ शकला.
आघाडीचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी चौथ्या गडयासाठी ५९ धावा काढल्या. मॅक्सवेलने ३७ तर, स्मिथने ५७ धावांची खेळी केली. अखेरीस अष्टपैलू मार्कस स्टोइनिस याने २५ चेंडूंमध्ये ४१ धावा काढत ऑस्ट्रेलियाला ५ बाद १५२ पर्यंत मजल मारून दिली. भारतासाठी रविचंद्रन अश्विनने दोन तर रवींद्र जडेजा, राहुल चहर व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
भारतीय फलंदाजांची पुन्हा झंझावाती फलंदाजी
ऑस्ट्रेलियाने ठेवलेले १५३ धावांचे आव्हान पार करण्यासाठी रोहित शर्मा व केएल राहुल मैदानात उतरले. राहुलने पहिल्या सामन्यातील फॉर्म कायम ठेवला. त्याने २ चौकार व तीन षटकार लगावत ३९ धावांची खेळी केली. पहिल्या सामन्यात विश्रांती घेतल्यानंतर रोहित शर्माने तीन षटकार व पाच चौकार ठोकत ६० धावांचे योगदान दिले. तो रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. सूर्यकुमार यादवने नाबाद ३८ व हार्दिक पंड्याने १४ धावांची खेळी करत १३ चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. भारताचा पहिला सुपर १२ सामना पाकिस्तान विरुद्ध २४ ऑक्टोबर रोजी दुबई येथे होईल.