---Advertisement---

राहुल-ईशानच्या वादळात उडाली इंग्लंड; सराव सामन्यात भारताचा शानदार विजय

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 11:12 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ मध्ये आपली मोहीम सुरू करण्यापूर्वी भारतीय संघ सराव सामन्यात इंग्लंडला सामोरा गेला. दुबई क्रिकेट ॲकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी धुवाधार फलंदाजी करत इंग्लंडला या सामन्यात पछाडले. केएल राहुल व ईशान किशन या भारतीय सलामीवीरांनी स्फोटक खेळ्या करत इंग्लंडने दिलेले १८९ धावांचे आव्हान एकदम छोटे करून ठेवले. यासह भारतीय संघाने आपल्या विश्वचषकासाठी संपूर्णपणे सज्ज असल्याचे दाखवून दिले.

इंग्लंडने उभारली मोठी धावसंख्या
दुबई क्रिकेट ॲकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा नियमित कर्णधार ओएन मॉर्गन याने या सामन्यात विश्रांती घेतली होती. त्याच्या जागी जोस बटलरने संघाचे नेतृत्व केले. बटलर व रॉय या सलामी जोडीने ३६ धावांची सलामी दिली. मोहम्मद शमीने ११ धावांच्या अंतरात या दोघांनाही तंबूत पाठवत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या डेव्हिड मलानने १८ धावांचे योगदान दिले. जॉनी बेअरस्टो व लियाम लिव्हींगस्टोन यांनी फटकेबाजी करत अनुक्रमे ४९ व ३० धावा ठोकल्या. अष्टपैलू मोईन अलीने अखेरीस ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ४३ धावा चोपल्या. भारतासाठी मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ तर राहुल चहर व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

भारतीय सलामीवीरांनी आणले वादळ
इंग्लंडने दिलेले १८९ धावांचे मोठे आव्हान केएल राहुल व ईशान किशन यांनी ताबडतोड फलंदाजी करत एकदम छोटे केले. राहुलने आयपीएलमधील आपला शानदार फॉर्म कायम राखत केवळ २४ चेंडूत ६ चौकार व तीन उत्तुंग षटकारांची आतिषबाजी करत ५१ धावा काढल्या. दोघांनी ८.२ षटकात ८२ धावांची सलामी दिली होती. राहुल बाद झाल्यानंतर ईशानने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्याने ४६ चेंडूवर ७ चौकार व तीन षटकार लगावत ६९ धावा काढल्या. त्यानंतर तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी ठरला व ८ धावा काढून डेव्हिड विलीचा शिकार ठरला.

सामन्याच्या अखेरीस रिषभ पंतने १४ चेंडूत २९ व हार्दिक पंड्याने १० चेंडूत १२ धावा काढून १९ व्या षटकात सामना भारताच्या नावे केला. भारताचा दुसरा सराव सामना २० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. त्यानंतर, भारत २४ ऑक्टोबर रोजी आपल्या विश्वचषक मोहिमेला पाकिस्तानविरुद्ध प्रारंभ करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---