---Advertisement---

खुशखबर! १९७२ नंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये धडक; ग्रेट ब्रिटनवर ३-१ ने विजय

On: रविवार, ऑगस्ट 1, 2021 7:07 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक्स २०२० चा दहावा दिवस (१ ऑगस्ट) भारतासाठी खूपच खास आहे. महिला बॅडमिंटनमध्ये एकेरी गटातील कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने इतिहास रचला. तिने या ऑलिंपिक्समध्ये भारतासाठी दुसरे पदक जिंकून दिले. यानंतर आता पुरुष हॉकी खेळातूनही आनंदाची बातमी येत आहे. उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनवर ३-१ ने विजय मिळवला आहे. तसेच विशेष म्हणजे १९७२ नंतर भारताने पहिल्यांदा उपांत्य सामन्यात धडक दिली आहे.

या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच भारताकडून दिलप्रीत सिंगने ७ व्या मिनिटाला शानदार फील्ड गोल करत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या कोर्टमध्ये १६ व्या मिनिटाला गुर्जंत सिंगने १६ व्या मिनिटाला गोल केला. यासह भारताला २-० ने आघाडी मिळाली. (India beat Great Britain 3-1 to qualify for men’s hockey semi-finals)

त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी ग्रेट ब्रिटनने एक गोल करत भारताविरुद्ध शानदार पुनरागमन केले. ग्रेट ब्रिटनसाठी वॉर्डने पेनल्टी कॉर्नरमध्ये मिळालेल्या चेंडूमार्फत गोल केला. तरीही सामन्यात भारत २-१ ने पुढेच होता.

विशेष म्हणजे सामन्याच्या अंतिम क्षणी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगला येलो कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे तो मैदानातून बाहेर गेला होता. त्याला ५ मिनिटांसाठी मैदानातून बाहेर राहावे लागले. त्यामुळे भारत १० खेळाडूंसोबत खेळला.

यानंतर भारताने पुन्हा एकदा आघाडी घेतली. हार्दिक सिंगने सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला मैदानी गोल केला. त्यामुळे भारताने ३-१ ने आघाडी घेतली आणि सामना खिशात घातला.

आता भारतीय संघ मंगळवारी (३ ऑगस्ट) उपांत्य सामन्यात बेल्जियम संघाचा सामना करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---